गणपतीच्या दर्शन गर्दीत चोरांनी हातसफाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 10:00 PM2019-09-04T22:00:25+5:302019-09-04T22:06:14+5:30
...आणि ६७ वर्षीय आजींना भेटला देवदूत
मुंबई - बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची ठिकठिकाणी रीघ लागलेली आहे. याच गर्दीचा फायदा घेत गुजरात, राजस्थानमधून आलेली टोळी भाविकांच्या पाकिटांसह मोबाइलवर डल्ला मारत आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या दोन ते तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या पत्नीची पर्स चोरीस गेली.
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्या दिवशीच मोबाइल गहाळ होण्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. सध्या तक्रारींचे प्रमाण कमी असले तरी नागरिकांनी सामानाची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, सोमवारी गृहमंत्री अमित शहा यांनी सकाळी सिद्धिविनायक आणि सायंकाळी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यासोबतच ३० ते ४० आयएएस अधिकाऱ्यांनीही पत्नीसह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यांच्यापैकी दोन ते तीन अधिकाऱ्यांच्या पत्नीची पर्स गहाळ झाल्याचे समोर आले. मात्र, पर्समध्ये जास्तीचा ऐवज नसल्याने याबाबत तक्रार करण्यात आली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मात्र, चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता आता पोलिसांनी बंदोबस्त वाढवण्यासह भाविकांनाही सावध राहण्याचे आवाहन भाविकांना केले आहे.
पोलिसांकडून लालबागच्या राजाच्या येथे कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली येथे १० साहाय्यक पोलीस आयुक्त, ४ पोलीस निरीक्षक, २० साहाय्यक पोलीस निरीक्षक, ५९ पोलीस उपनिरीक्षक, ५०० पोलीस अंमलदार, राज्य राखीव पोलीस बल आणि दंगल नियंत्रण पथकाची प्रत्येकी एक तुकडी, डीएमएफडी आणि एचएचएमडी प्रत्येकी २४, सीसीटीव्ही व्हॅन २ आणि २ कॉम्बॅक्ट व्हॅन तैनात ठेवल्या आहेत.
...आणि ६७ वर्षीय आजींना भेटला देवदूत
शीतल मांजरेकर (६७) या सोमवारी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आल्या होत्या. दरम्यान, त्यांना भोवळ आल्याने त्या कोसळल्या. त्या वेळी तेथे तैनात असलेल्या काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बसवत यांनी त्यांना गर्दीतून वेळीच बाहेर काढले आणि त्यांच्यावर औषधोपचार करून त्यांना सुखरूप घरी पोहोचविले. त्यामुळे या गर्दीत देवदूतच भेटल्याचे आजींनी सांगितले.