वेश बदलून वेगवेगळ्या रिक्षाने पळालेले चोर अटकेत; चारकोप पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 07:20 AM2021-02-19T07:20:15+5:302021-02-19T07:20:34+5:30
Crime News : रविकुमार सिंह आणि श्याम गुजर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे मालवणीत जरीमरी कॉटेजमध्ये राहत असून, सिंह व्यवसायाने केटरर्स आहे. गुजर हा बेरोजगार आहे.
मुंबई : ग्राहक बनून सोने-चांदीच्या दागिन्यांच्या दुकानात शिरत चोरी करणाऱ्या दुकलीला पोलिसांनी अटक केली आहे. चारकोप पोलिसांनी गुरुवारी ही कारवाई केली आहे. चोरीला गेलेली शंभर टक्के मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केली आहे.
रविकुमार सिंह आणि श्याम गुजर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे मालवणीत जरीमरी कॉटेजमध्ये राहत असून, सिंह व्यवसायाने केटरर्स आहे. गुजर हा बेरोजगार आहे. या दोघांनी चारकोपच्या सेक्टर ४ येथे पद्ममावती ज्वेलर्समध्ये लाखो रुपयांचे दागिने पळवून नेले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, ते ग्राहक बनून दुकानात आले. दागिने चोरले. नंबर प्लेट नसलेल्या पल्सर मोटरसायकलने पसार झाले. याबाबत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस मनोहर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी सीसीटीव्ही पडताळणी सुरू केली. आरोपी मालाडच्या सोमवार बाजार परिसरात दुचाकी सोडून वेश बदलत वेगवेगळ्या रिक्षांनी पसार झाल्याचे त्यांना दिसले. अधिक खंगाळणीमध्ये एक जण मालवणीच्या दिशेने जाताना त्यांना दिसला.
त्यानुसार शिंदे यांचे पथक कॅथॉलिक चाळीकडे पोहोचले आणि दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेले अडीच लाखांचे सोनेही हस्तगत करण्यात आले.
एमएचबी परिसरात त्यांच्यावर गुन्हा दाखल असून, काशिमीरामधून चोरलेली मोटारसायकल त्यांनी दागिने चोरीसाठी वापरल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.