भर चौकातील ATM चोरट्यांनी फोडले, १३ लाख लुटले; ५ दिवस बँकेला कळलेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2023 11:52 AM2023-07-18T11:52:31+5:302023-07-18T11:52:40+5:30
शनिवार असल्याने त्यांनी सुट्टी असल्याचे सांगत विषय टाळला. त्यानंतर सोमवारी बँका सुरु झाल्यानंतर त्यांनी व्यवहार तपासले.
पुणे : शहरातील भर गर्दीचा रोडवर स्टेट बँकेचे एटीएम सेंटर आहे. चोरट्यांनी गॅस कटर व लोखंडी रॉडने या एटीएम सेंटरमधील मशीन फोडले. आतील १३ लाख ३४ हजार २०० रुपये चोरुन नेले. या चोरीची तब्बल ५ दिवस ना बँकेला कल्पना होती, ना सुरक्षा कंपनीला. खोटे वाटते ना़ पण, हे खरे आहे. बँकेचा कारभार किती भोंगळ असू शकतो, याचा हा नमूना समोर आला आहे. फडके हौद चौकात असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरबाबत हा प्रकार घडला आहे.
याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात बँकेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएम सेंटरमध्ये कॅमेरे असतात. कोणी त्या मशीनला हात लावला तर सायरन वाजतो, असे सांगितले जाते. पण, लाखो रुपये असलेल्या या मशीनच्या सुरक्षेबाबत बँका किती निष्काळजी असतात, याचा प्रत्यय फडके हौद चौकातील एटीएम सेंटरबाबत आला.
याबाबत फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी माहिती दिली. या एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या एक महिन्यांपासून बंद होते. सेंटरमधील सायरन सिस्टिमही बंद होती. गर्दीच्या ठिकाणी हे सेंटर असूनही तेथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. या सेंटरमधील मशीनमध्ये १० जुलैला पैसे भरण्यात आले होते. त्यानंतर पुढील ५ दिवस कोणाचेही त्याकडे लक्ष नव्हते. नेहमी प्रमाणे १५ जुलै रोजी पैसे भरणारी व्हॅन तेथे आली. तेव्हा ते एटीएम मशीन गॅस कटर व लोखंडी रॉडच्या सहाय्याने फोडून आतील सर्व रक्कम चोरुन नेण्यात आली होती. चोरट्यांनी हे एटीएम कधी फोडले, हे कोणालाच माहिती नाही. बँकेच्या अधिकार्यांना ही गोष्ट सांगण्यात आली. पण, या एटीएममधून चोरट्यांनी किती रक्कम लांबविली, याची काहीही माहिती बँक अधिकार्यांकडे नव्हती.
शनिवार असल्याने त्यांनी सुट्टी असल्याचे सांगत विषय टाळला. त्यानंतर सोमवारी बँका सुरु झाल्यानंतर त्यांनी व्यवहार तपासले. तेव्हा चोरट्यांनी तब्बल १३ लाख ३४ हजार २०० रुपये चोरुन नेल्याचे निष्पन्न झाले. बँकेच्या निष्काळजीपणामुळे लोकांच्या पैशांवर चोरट्यांनी डल्ला मारला. आता त्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांवर आले आहे.