कामगारांच्या पगारावर चोरांचा डल्ला; नेरूळमध्ये भररस्त्यात व्यावसायिकाची रोकड पळवली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 01:01 PM2024-10-31T13:01:46+5:302024-10-31T13:12:46+5:30
नवी मुंबई आणि परिसरात यापूर्वीदेखील बँकेतून रोख रक्कम घेऊन बाहेर आलेल्या व्यक्तींना अशाच प्रकारे लुटल्याचे प्रकार घडलेले आहेत.
नवी मुंबई : कामगारांचा पगार देण्यासाठी बँकेतून काढलेली रोकड चोरांनी पळवल्याची घटना नेरूळमध्ये घडली. या प्रकरणी दोन अज्ञातांवर नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बँकेतच व्यावसायिकावर पाळत ठेवून आरोपींनी ही लूट केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नेरूळ परिसरात राहणाऱ्या संतोष मंजूळकर यांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय असून, दिवाळीनिमित्ताने त्यांनी कामगारांना पगार देण्यासाठी मंगळवारी बँकेतून १ लाख २० हजार रुपये काढले. रोकड घेऊन ते बँकेपासून काही अंतरावर रस्ता ओलांडत असताना पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या हातातील बॅग हिसकावून पळ काढला. यावेळी त्यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; पण लुटारूंनी मोटारसायकल भरधाव चालवत धूम ठोकली. या घटनेनंतर नेरूळ पोलिसांनी अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ऐन दिवाळीत चोर पुन्हा सक्रिय
नवी मुंबई आणि परिसरात यापूर्वीदेखील बँकेतून रोख रक्कम घेऊन बाहेर आलेल्या व्यक्तींना अशाच प्रकारे लुटल्याचे प्रकार घडलेले आहेत. याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यांत गुन्हेही दाखल आहेत. ऐन दिवाळीत आता पुन्हा बँकांमधील व्यवहारांवर पाळत ठेवणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. नेरूळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व इतर माध्यमांतून पोलिसांचा तपास सुरू आहे.