करमाळ्यात चोरट्यांचा हैदोस; घरातून १२ तोळे सोने अन् ७० हजार रोकड लांबवली
By काशिनाथ वाघमारे | Updated: May 21, 2023 23:52 IST2023-05-21T23:51:39+5:302023-05-21T23:52:04+5:30
या चोरीनंतर चोरट्यांनी पोफळज रस्त्यानजीक असलेले शरद पाटील यांच्या शेतातील घरापुढील मोटार सायकल चोरून पळ काढला.

करमाळ्यात चोरट्यांचा हैदोस; घरातून १२ तोळे सोने अन् ७० हजार रोकड लांबवली
सोलापूर : इमारतीच्या पोर्चला लावलेल्या ग्रीलच्या आधारे टेरेसवर जात उघड्या खोलीतून घरात प्रवेश करून चोरट्यांनी १२ तोळे सोने व रोख ७० हजार रुपये लांबवले. करमाळा तालुक्यात शेटफळ येथे शुक्रवारी मध्यरात्री चोरीचा हा प्रकार घडला. या चोरीनंतर चोरट्यांनी पोफळज रस्त्यानजीक असलेले शरद पाटील यांच्या शेतातील घरापुढील मोटार सायकल चोरून पळ काढला.
शेटफळ येथील गावाच्या नजीक असलेल्या प्रतापसिंह लबडे यांच्या शेतातील घरात रात्री १ वाजता चोरट्याने पोर्चमध्ये लावलेल्या ग्रीलचा आधार घेत टेरेसवरून प्रवेश केला. कपाटामधील सोन्याचे दागिने व कपड्यांच्या खिशातील पैसे याची चोरी केली. चोरी करत असताना घरातील व्यक्ती जागे झाल्याचा संशय येताच घराचे मुख्य दरवाजातून चोरटे पळून गेले.
सीसीटीव्ही फुटेज तपासले...
माहिती मिळताच रात्रीत करमाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनायक माहूरकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी धाव घेतली. गावामध्ये दुकानाबाहेरील लावलेल्या सीसीटीव्ही फुटेज वरून चोरट्यांचा माग शोधण्याचा प्रयत्न केला.
एकाच रात्रीत पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न
चोरट्यांनी सुभाष गडगुले यांच्या शेतातील घराकडे मोर्चा वळवला तिथे त्यांच्या हाती काहीच लागले नाही. यानंतर ज्ञानदेव पोळ यांच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. तिथेही लोक जागे झाले. तेथून महादेव गुंड यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. तिथे त्यांचे हाती किरकोळ रक्कम लागली. नंतर शेजारी शरद पाटील यांच्या शेतातील घरासमोर लावलेली मोटारसायकल पळवली. एकाच रात्रीमध्ये पाच ठिकाणी चोरी करण्याचा धाडसी प्रयत्न केला.