रेल्वेत चोऱ्या; तिघांना बेड्या, नागपूर परिसरात सात चोरीच्या घटना उघडकीस

By नरेश डोंगरे | Published: February 25, 2024 07:54 PM2024-02-25T19:54:40+5:302024-02-25T20:03:47+5:30

बेसावध प्रवाशांना बसायचा फटका, करण्यात आले रेल्वे पोलिसांच्या हवाली

Thieves in trains; Three cases of theft revealed in Bedya, Nagpur area | रेल्वेत चोऱ्या; तिघांना बेड्या, नागपूर परिसरात सात चोरीच्या घटना उघडकीस

रेल्वेत चोऱ्या; तिघांना बेड्या, नागपूर परिसरात सात चोरीच्या घटना उघडकीस

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: रेल्वे गाडी आणि स्थानक परिसरात चोऱ्या करणाऱ्या तीन भामट्यांना वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) जेरबंद केले. चाैकशीनंतर त्यांच्याकडून सात चोरीच्या घटनांचा उलगडा झाला. त्यांना रेल्वे पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

भंडारा जिल्ह्यातील आलेसूर येथील रहिवासी असलेला आरोपी पुरुषोत्तम गजानन बावणे (वय ३६) हा संधी साधून रेल्वे प्रवाशांचे सामान चोरतो. १६ फेब्रुवारीला त्याने अशाच प्रकारे येथील रेल्वे स्थानकावरून एका वृद्ध प्रवाशाचा मोबाइल चोरला होता. त्याची रेल्वे पोलिसांकडे तक्रारही दाखल आहे. २२ फेब्रुवारीला तो रेल्वे स्थानकावर येऊन पुन्हा सावज शोधू लागला. त्याच्या वर्तनावरून संशय आल्यामुळे आरपीएफचे संतोष झरणे, नीरज कुमार आणि अमित कुमार यांनी त्याला ताब्यात घेऊन चाैकशी केली असता त्याने मोबाइल चोरीची कबुली दिली.

दुसऱ्या चोरट्याचे नाव रूपेश नंदकिशोर पांडे (वय ३०) असून, तो नागपुरातील शांतीनगरात राहतो. हा भामटा सराईत चोर असून त्याने अवघ्या दोन आठवड्यांत रेल्वे स्थानक परिसरात एका महिलेच्या पर्ससह तीन चोऱ्या केल्या. आरपीएफचे बी. डी. अहिरवार, देवेंद्र पाटील, लुनाराम टांक आणि राकेश पाल यांनी पांडेच्या मुसक्या बांधल्या.

तिसरा आरोपी गोंदिया जिल्ह्यातील सरकारटोला, मुंडीपार येथे राहतो. दिलीप काभलकर (वय ३२), असे त्याचे नाव असून, आरपीएफचे नीरज कुमार आणि रवींद्र कुमार या जवानाने त्याला ताब्यात घेतले. त्याने चाैकशीदरम्यान यापूर्वीच्या अनेक मोबाइल चोरीची कबुली दिली. या तिघांनाही रेल्वे पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

बेसावध प्रवाशांना फटका

गेल्या काही दिवसांपासून नागपूर रेल्वे स्थानक परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरीच्या या गुन्ह्यात सर्वाधिक घटना मोबाइल चोरीच्या आहेत. प्रवासी बेसावध होताच चोरटे त्याचा मोबाइल किंवा पर्स लंपास करतात. रेल्वे पोलिस आणि आरपीएफ या घटनांना आळा घालण्यासाठी कामी लागले आहेत. प्रवाशांनी आपले किमती सामान व्यवस्थित ठेवावे आणि सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Thieves in trains; Three cases of theft revealed in Bedya, Nagpur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.