चोरटे मोकाट; पोलीस ठाण्यातच साफ केला हात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 08:31 PM2019-01-07T20:31:05+5:302019-01-07T20:32:27+5:30
घरगुती भांडणाची तक्रार देण्यासाठी तुळींज पोलीस ठाण्यात आलेल्या शीला चव्हाण यांना अशा चोरीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. मात्र, पोलिसांनी चव्हाण या मंगळसूत्र चोरीला गेल्याचा बनाव करत असल्याचे सांगितले आहे.
वसई - कुख्यात गुंडांना पकडून पोलीस ठाण्यात डांबले जात असताना नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्यातच महिलेचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र तिच्या पाकिटातून गायब झाल्याची धक्कादायक घटना घडली. घरगुती भांडणाची तक्रार देण्यासाठी तुळींज पोलीस ठाण्यात आलेल्या शीला चव्हाण यांना अशा चोरीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. मात्र, पोलिसांनी चव्हाण या मंगळसूत्र चोरीला गेल्याचा बनाव करत असल्याचे सांगितले आहे.
घरगुती भांडणांबाबत शीला चव्हाण यांनी ज्यांच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यांना पोलिसांनी तुळींज पोलीस ठाण्यात बोलावले होते. दरम्यान, चव्हाण यांनी मंगळसूत्र काढून हातातील पाकीटामध्ये ठेवले पाकीट त्यांनी पोलीस ठाण्याच्या स्वागत कक्षातील टेबलावर ठेवले होते. मात्र, काही वेळातच तेथून पाकीट गायब झाल्याने चव्हाण यांनी शोधाशोध केली. त्यावेळी एका महिलेने पोलिसांना चव्हाण यांची काही वेळापूर्वी गायब झालेली पाकीट परत केले. मात्र त्यात मंगळसूत्र नसल्याने चव्हाण यांनी आरडाओरड केली. पोलिसांनी मंगळसूत्र चोरीची तक्रार दाखल करून न घेता चव्हाण पाकीट घेऊन घरी गेल्या. त्यानंतर मंगळसूत्र नसल्याचा दावा करू लागल्या, असा युक्तिवाद केला. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून पहा सत्य समोर येईल असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.