हवालाच्या पाऊण कोटींच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांच्या डल्ला; धुळ्यातील धक्कादायक घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2023 01:12 PM2023-06-18T13:12:32+5:302023-06-18T13:12:51+5:30
कुरिअर कंपनीचा कर्मचारी गोविंद सिंह हा धुळे आगारातच बस आल्यानंतर देखील झोपेतच होता.
धुळे शहरातील चार ते पाच सराफी पिढीच्या व्यापाऱ्यांनी मुंबई येथून सोन्याचे दागिने नेहमीप्रमाणे खरेदी केलेत. मात्र हे दागिने परिवहन महामंडळाच्या बस मधूनच चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली. असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
धुळे शहरातील चार ते पाच सराफी पिढीच्या व्यापाऱ्यांनी नेहमी प्रमाणे मुंबईतून सोन्याचे दागिने खरेदी केले हे दागिने नेहमीप्रमाणे कुरियर कंपनीच्या माध्यमातून धुळ्यात आणण्यासाठी कंपनीच्या ताब्यात देण्यात आले. विष्णुसिंह शिखरवार वय 32 राहणार नगलादास जिल्हा आग्रा, हल्ली मुक्काम काळबादेवी मुंबई या तरुणाच्या जय बजरंग कुरिअर कंपनीने धुळ्या बरोबरच नाशिक, मालेगाव आणि नंदुरबार च्या व्यापाऱ्यांचे सोन्याचे दागिने देखील डिलिव्हरीसाठी घेतले होते.
14 जूनला कुरिअर कंपनीचा कर्मचारी सोन्याचे दागिने घेऊन डिलिव्हरी देण्यासाठी निघाला. त्याने सर्वप्रथम नाशिक येथील व्यापाऱ्यांचे सुमारे 50 लाखांचे सोन्याच्या दागिन्यांची पोहच केली. त्यानंतर नाशिक बायपास गाडीने तो धुळ्यातील व्यापाऱ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या डिलिव्हरीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये बसला. या प्रवासादरम्यान चोरट्यांनी डाव साधत धुळे, मालेगाव, नंदुरबार येथील व्यापाऱ्यांचे सुमारे 64 लाख 80 हजार रुपयांचे दागिने लंपास केले.
कुरिअर कंपनीचा कर्मचारी गोविंद सिंह हा धुळे आगारातच बस आल्यानंतर देखील झोपेतच होता. त्याला बसमधील प्रवाशांनी जागे केले यावेळी त्यांनी आपल्याकडील बॅगची तपासणी केली असता दागिन्यांची चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने या घटनेची माहिती मुंबई येथील कुरियर कंपनीच्या मालकाला दिली. कुरियर कंपनीच्या मालकाने ज्या सराफी व्यापाऱ्यांचे दागिने चोरीला गेले त्यांच्याशी संपर्क साधला तर धुळ्यातील ज्या व्यापाऱ्यांचे दागिने चोरीला गेले होते त्यांनी देखील धुळे शहर पोलीस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कुरिअर कंपनीच्या मालकाने अज्ञात चोरट्याविरुद्ध 64 लाख 80 हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिने चोरीची तक्रार शहर पोलिसात दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.