११ लाखांची रोकड अन् तीन तोळे दागिने असलेली तिजोरी चोरट्यांनी पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 09:51 PM2021-01-13T21:51:32+5:302021-01-13T21:57:30+5:30
नाशिक शहर व परिसरात पुन्हा गुन्हेगारीने नववर्षात डोके वर काढले आहे. शहर पोलिसांपुढे वाढत्या गुन्हेगारीचे आव्हान उभे राहिले आहे. शहरात खून, घरफोड्या, जबरी लूट, हाणामाऱ्या, वाहनचोरीसारख्या घटना सातत्याने घडू लागल्याने नाशिककरांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
नाशिक : शहर व परिसरात सातत्याने घरफोड्या, वाहनचोरी, जबरी चोरीसह खनाच्या घटना घडत असताना चोरट्यांनी कामगारनगरमध्ये भरदुपारी 'मधुमैत्री' नावाच्या बंगल्याचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत घराच्या कपाटात ठेवलेली ११ लाख रुपयांची रोकड आणि तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने ज्या तिजोरीत ठेवलेले होते, ती तिजोरीच हातोहात लांबविल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.१३) दुपारी घडली. एकीकडे सोनसाखळी चोरांनी पोलिसांच्या नाकीनव आणले असताना दुसरीकडे दिवसाढवळ्या मोठी घरफोडी करत गुन्हेगारांनी पोलिसांना पुन्हा खुले आव्हान दिल्याची चर्चा होऊ लागली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मधुमैत्री बंगल्यात राहणारे डॉ. नरेंद्र पाटील व त्यांची पत्नी कामानिमित्त बुधवारी दुपारच्या सुमारास बंगल्याचा दरवाजा बंद करुन घराबाहेर पडले. बंगल्याच्या मुख्य दरवाजाला आतील बाजुने लॉक करण्यात आले असतानाही चोरट्यांनी हे लॉक तोडून मुख्य दरवाजातून घरामध्ये प्रवेश केला. घरातील लोखंडी गोदरेजची तिजोरीच चोरट्यांनी पळविली. या तिजोरीत सुमारे ११ लाख रुपयांची रोकड व तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असल्याचे पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दवाखान्याची बाह्यरुग्न तपासणी आटोपून पाटील जेव्हा संध्याकाळी घरी परतले तेव्हा त्यांना बंगल्याचा दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आले. यावेळी त्यांनी तत्काळ बेडरुममध्ये धाव घेतली असता तेथे रोकड, दागिने असलेली तिजोरीच गायब असल्याचे दिसले. पाटील यांनी त्वरित पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घटनास्थळी पोलीस दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती तत्काल बिनतारी संदेश यंत्रणेवरुन देत परिसरात नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले. सातपुर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.