नंदुरबारात चोरट्यांनी एटीएम मशिनच नेले चोरून; लाखोंची रक्कम लंपास
By मनोज शेलार | Published: February 22, 2024 06:35 PM2024-02-22T18:35:12+5:302024-02-22T18:35:35+5:30
शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील दहिंदुले शिवारात एटीएम मशिन कटर मशिनने तोडलेले आढळून आले.
नंदुरबार : शहरातील करण चौफुली भागात असलेले एटीएम मशिनच चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. एटीएममध्ये सुमारे २६ लाख रुपयांचा भरणा बुधवारी करण्यात आलेला होता. त्यातील किती रक्कम लंपास झाली, याबाबत पडताळणी करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील दहिंदुले शिवारात एटीएम मशिन कटर मशिनने तोडलेले आढळून आले.
नंदुरबारातील करण चौफुली भागात भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. या एटीएममधील मशिनच गुरुवारी पहाटे चोरट्यांनी पळवून नेले. सकाळी ही बाब उघड झाल्यावर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबविली असता दहिंदुले रस्त्यावरील एका शेतात एटीएम मशिन कटर मशिनच्या साह्याने तोडलेले आढळून आले. एटीएममध्ये बुधवारी २६ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला होता.
दिवसभरात किती रक्कम त्यातून काढली गेली व चोरट्यांनी किती रक्कम लंपास केली, याची पडताळणी करण्याचे काम बँकेकडून सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. तरी साधारणत: २० लाखांपर्यंतची रक्कम चोरीला गेल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. चोरट्यांनी एटीएम फोडताना सीसीटीव्ही कॅमेरे देखील तोडल्याचे आढळून आले आहे. याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत नंदुरबार उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.