चोराचा कारनामा! शक्कल लढवत चोरली सरकारी रुग्णवाहिका अन् झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 03:45 PM2024-01-18T15:45:57+5:302024-01-18T15:46:33+5:30
एका चोराने शक्कल लढवून सेंट्रलाइज्ड एक्सिडेंट अँड ट्रॉमा सर्व्हिसेस (सीएटीएस) ची रुग्णवाहिकाच पळवून नेली.
दिल्लीत दररोज छोट्या-मोठ्या लक्झरी वाहनांच्या चोरीच्या घटना समोर येत आहेत. यावेळी एका चोराने शक्कल लढवून सेंट्रलाइज्ड एक्सिडेंट अँड ट्रॉमा सर्व्हिसेस (सीएटीएस) ची रुग्णवाहिकाच पळवून नेली. ड्रायव्हरने लोकेशन इंचार्ज यांना फोन केला, त्यांना रुग्णवाहिका सापडली नाही. पोलिसांना बोलावून याबाबत माहिती देण्यात आली. मधू विहार पोलीस ठाण्यात तब्बल 22 तासांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर काही वेळातच खिचडीपूर येथील केंद्रीय विद्यालयाजवळ रुग्णवाहिका उभी असल्याचं आढळून आलं.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये मास्क लावलेला एक माणूस दिसत आहे. चोरट्याने रुग्णवाहिका का चोरली हा साहजिकच प्रश्न आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत, जेणेकरून रुग्णवाहिका चोरीमागील हेतू उघड होऊ शकेल. मोहित कुमार वर्मा हा कुटुंबासह खिचडीपूरच्या कँपमध्ये राहतो. तो व्यवसायाने ड्रायव्हर आहे, जो सध्या दिल्ली सरकारची CATS रुग्णवाहिका चालवतो. त्याने पोलिसांना सांगितलं की, 14 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास त्याने रुग्णवाहिका मांडवली येथील जोशी कॉलनी येथील कम्युनिटी सेंटरच्या लोकेशन पॉईंटवर उभी केली.
पॅरामेडिकल कर्मचारी मधुसूदन हाही त्याच्यासोबत होता. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दोघंही रुग्णवाहिकेला कुलूप लावून जेवायला बाहेर पडले. साडेपाचच्या सुमारास आम्ही परतलो तेव्हा तेथून रुग्णवाहिका गायब होती. आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली आणि आजूबाजूला पाहिलं तर कुठेही रुग्णवाहिका दिसली नाही. सुमारे अर्ध्या तासानंतर जीपीएसद्वारे लोकेशन ट्रॅक करता यावे, यासाठी लोकेशन प्रभारी यांना कॉल करण्यात आला. पण जीपीएस काम करत नव्हतं.
15 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुमारे दोन तासांनंतर खिचडीपूर येथील केंद्रीय विद्यालयाजवळ रुग्णवाहिका उभी असल्याची माहिती मिळाली. चोरट्याने रुग्णवाहिकेचा जीपीएस तोडल्याचं तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी जवळपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन केले. कॅमेऱ्यात चोर दिसत होता. त्याने टोपी घातली असून तोंडाला मफलर बांधला आहे. चोराने 4:42 वाजता रुग्णवाहिका चोरली, नंतर ती 4:46 वाजता सोडून दिल्याचं फुटेजमध्ये उघड झालं आहे.