हायटेक सुपरफास्ट चोर, अवघ्या 17 मिनिटांत चोरट्यांनी पळवून नेलं 26 लाख असलेलं ATM
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 12:18 PM2024-04-21T12:18:38+5:302024-04-21T12:20:45+5:30
एटीएम मशीन चोरट्यांनी थेट पळवून नेलं. एटीएम मशिनमध्ये तब्बल 26 लाख रुपयांची रोकड असल्याचं सांगितलं जात आहे.
राजस्थानच्या अलवरला लागून असलेल्या खैरथलच्या औद्योगिक परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी थेट पळवून नेलं. एटीएम मशिनमध्ये तब्बल 26 लाख रुपयांची रोकड असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खैरथल येथील इस्माइलपूर रोडवरील इंडस कंपनीजवळ असलेल्या पीएनबीच्या एटीएममध्ये ही घटना घडली. एटीएमजवळ राजकुमार टी स्टॉल आहे. रविवारी पहाटे चार वाजता राजकुमार चहाचा स्टॉल सुरू करण्यासाठी तेथे पोहोचला असता त्याला एटीएमची काच तुटलेली दिसली. हे पाहून त्यांनी कंपनीचे गार्ड दीपक व शेजारी असलेल्या इतरांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच किशनगढबासचे डीएसपी राजेंद्र सिंह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून आसपासच्या लोकांकडून आणि बँक व्यवस्थापनाकडून संपूर्ण माहिती घेतली. पीएनबीच्या शाखा व्यवस्थापकाने सांगितलं की, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने शनिवारीच एटीएम मशीनमध्ये 28 लाख रुपये जमा केले होते. त्यातील अडीच लाख रुपयांची रक्कम काढण्यात आली होती. एटीएम मशिनमध्ये 26 लाख रुपयांची रक्कम असल्याचं सांगण्यात येत आहे.
रात्री 2:17 वाजता एक कार तेथे येऊन थांबल्याचे तेथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. त्यात आलेल्या हल्लेखोरांनी अवघ्या 17 मिनिटांत हा गुन्हा केला. ते एटीएम मशिन घेऊन दुपारी 2.34 वाजता परत गेले. ततारपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी अंकेश चौधरी यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. तेथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले.