ज्वेलरी शॉपच्या बाजूला ज्यूसचं दुकान टाकलं, भिंतीला छिद्र पाडलं अन् सर्व माल केला लंपास...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 11:08 AM2021-01-27T11:08:12+5:302021-01-27T11:08:21+5:30
नवी मुंबई पोलिसांनी दोन चोरांना अटक केली आहे. त्यांनीही फिल्मी स्टाइल अंदाजात एक ज्वेलरीचं दुकान फोडून कोट्यावधींचा माल लंपास केलाय.
अनेकदा अनेक फिल्मी स्टाइल चोऱ्यांच्या घटना समोर येत असतात. कधी कधी तर चोर इतकं डोकं कसं चालवतात अशा प्रश्नही पडतो. अशीच घटना ठाण्यातून समोर आली आहे. नवी मुंबई पोलिसांनी दोन चोरांना अटक केली आहे. त्यांनीही फिल्मी स्टाइल अंदाजात एक ज्वेलरीचं दुकान फोडून कोट्यावधींचा माल लंपास केलाय.
चोरांनी फारच चतुराईने आधी ज्वेलरीच्या दुकानाच्या बाजूला एक दुकान भाड्याने घेतलं आणि दोन्ही दुकानांच्या मधे असलेल्या भिंतीला ड्रिलींग मशीनच्या माध्यमातून छिद्र पाडून नंतर कोट्यावधी रूपयांचा माल घेऊन फरार झाले. ज्या व्यक्तीने ही चोरी केली तो झारखंडचा राहणारा असल्याचं समोर आलं.
नवी मुंबई पोलिसातील एसीपी विनायक वस्त यांनी सांगितले की, चोरांनी आधी वर्तक नगरमध्ये असलेल्या पोखरण रोडवरील ज्वेलरीच्या दुकानावर काही दिवस नजर ठेवली. जेव्हा त्यांना समजलं की, ज्वेलरीच्या दुकानाच्या बाजूचं दुकान रिकामं आहे त्यांनी दुकान मालकाकडून ते भाड्याने घेतलं. त्यानंतर त्यांनी गॅस कटरसोबत इतरही साहित्य जमा केलं. त्यानंतर चोरांनी एक आठवडा दुकानाचं टायमिंग, कोणत्या दिवशी दुकान बंद राहतं या सर्व गोष्टींचा अभ्यास केला.
ज्या व्यक्तीने दुकान भाड्याने घेतलं होतं त्याचं नाव राहुल अब्दुल माजिद शेख आहे. त्याने भाड्याने घेतलेल्या दुकानासमोर 'अब्दुल फ्रूट्स' नावाचं एक साइन बोर्डही लावलं होतं. १७ जानेवारीच्या रात्री राहुलने आपल्या चार मित्रांसोबत दुकानाला छिद्र पाडून आतील सर्व माल लंपास केला.
असे सांगितले जात आहे की चोरी झालेल्या सामानाची किंमत साधारण १.३७ कोटी रूपये इतकी आहे. जेव्हा पोलिसांना राहुल आणि त्याच्या एक मित्र साहेब अकबर शेखबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी काही ज्वेलरीसोबत त्यांना अटक केली. दोघांनीही आपला गुन्हा मान्य केला आहे. पोलीस आता इतर चार चोरांचा शोध घेत आहेत.