डिमार्टच्या मालाचा ट्रक चोरणारे चोरटे पोलिसांनी केले जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 04:15 PM2020-09-02T16:15:17+5:302020-09-02T16:16:30+5:30
सराईत गुन्हेगार : रबाळे एमआयडीसीत घडलेली घटना
नवी मुंबई : पुणे येथील डिमार्टमध्ये पाठवलेल्या मालाचा ट्रक चोरणाऱ्या तिघांना व चोरीचा माल घेणाऱ्या एकाला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 18 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रबाळे एमआयडीसी मधून ट्रक चोरीला गेल्याची तक्रार 12 ऑगस्टला प्राप्त झाली होती. ट्रकमध्ये पुणेतील डिमार्ट साठी भिवंडी गोडाऊन मधून पाठवण्यात आलेला माल होता. तर भिवंडी ते पुणे दरम्यान चालकाने विश्रांतीसाठी ट्रक रबाळे एमआयडीसी येथे उभा करून तो घरी गेला होता. यादरम्यान अज्ञात व्यक्तींनी बनावट चावीद्वारे ट्रक चालू करून चोरला होता. या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नितीन गिते यांनी निरीक्षक अजित पाटील, सहायक निरीक्षक नितीन खाडे, सागर गवराने, उपनिरीक्षक शरद आव्हाड, हवालदार मेघराज देवरे, रघुनाथ मागी, अजित यादव, हेमंत पाटील, वैभव पोळ, तुषार जाधव, नितीन सोनवणे आदींचे पथक तयार केले होते.
या पथकाने घटनास्थळ व ट्रकच्या प्रवास मार्गावरील सीसीटीव्ही तपासून संशयीत तिघांना अटक केली असता चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चंपालाल चौधरी (30), प्रकाश चौधरी (20) व मोहम्मद पठाण (20) अशी त्यांची नावे आहेत. भिवंडी येथून ट्रक निघाला असता खासगी कारमधून ते ट्रकचा पाठलाग करत होते. अखेर तो रबाळे एमआयडीसी मध्ये उभा केला असता बनावट चवीने तो चालू करून चोरला होता. यानंतर त्यांनी सदर ट्रक त्यामधील मालासह नरेश भानुशाली (37) याला विकला होता. यानुसार भानुशाली याला देखील 28 ऑगस्ट रोजी अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन गीते यांनी सांगितले. या टोळीकडून चोरीचा ट्रक, गुन्ह्यात वापरलेली कार तसेच ट्रकमधील माल असा 18 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ट्रक चोरणारे तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर ठिकठिकाणी गुन्हे दाखल आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला
Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा