दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! दिल्लीत गुन्हेगारांची चांदी; पोलिसांकडून कारवाईच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 07:28 PM2019-11-06T19:28:00+5:302019-11-06T19:30:07+5:30
गेले दोन दिवस पोलीस कारवाई करत नसल्याने गुन्हेगार मोकाट आहेत.
नवी दिल्ली - पोलिसांविरोधातवकिल आक्रमक झाल्याचं चित्र आहे. दिल्ली पोलीस आणि काही वकिलांमध्ये पार्किंगच्या कारणावरुन वाद झाला. हा वाद पुढे फक्त उफाळलाच नाही तर चिघळला सुद्धा. एका वकिलाने लॉकअप व्हॅनसमोर कार उभी केली होती. पोलिसांनी वकिलाला असे करु नका असे म्हटले होते. मात्र, तीस हजारी कोर्टात वकील आणि पोलीस यांच्यात हाणामारी झाली. या घटनेनंतर दिल्लीत पोलीस विरुद्ध वकील असा वादंग निर्माण झाला आहे. या वादाचा गुन्हेगारांना फायदा झाला असून त्यांच्याविरोधात गेले दोन दिवस पोलीस कारवाई करत नसल्याने गुन्हेगार मोकाट आहेत.
गुन्हेगारांना अटक करून देखील कोर्टात हजर करता येत नसल्याने दिल्लीत पोलीस गुन्हेगारांना वकील आणि पोलिसांच्या पेटलेल्या वादामुळे अटक करत नाही आहेत. एखाद्या मोठ्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला जेरबंद केलं जात असून अशा गुन्हेगारांना ड्युटी मॅजिस्ट्रेटसमोर हजर केलं जातं. ही सुनावणी कोर्टात न होता ड्युटी मॅजिस्ट्रेटच्या घरी होते.
२४ तासांत गुन्हेगाराला कोर्टात करण्यात येतं हजर
पोलीस आणि वकिलांमधील चिघळलेल्या वादामुळे वकिलांनी आंदोलन छेडले आहे. तसेच कोर्टात पोलिसांना जाऊ देत नाही आहेत. त्यामुळेच पोलीस क्षुल्लक आणि सध्या केसेसमधील गुन्हेगारांना पकडत नाही आहे. कारण, त्यांना अटक केली तर २४ तासांत कोर्टात हजर करणं अपरिहार्य आहे. सोमवारपासून वकील दिल्लीतील जिल्हा कोर्टात पोलिसांना येऊ देत नाही आहेत.
मंगळवारी केवळ ९६ गुन्हेगारांना अटक
दिल्ली पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत वेगवेगळ्या जिल्ह्यातील १८६ पोलीस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्याअंतगर्त ५ नोव्हेंबर रोजी ९६ गुन्हेगारांना अटक अरण्यात आली आहे. पश्चिम दिल्लीत ९, दक्षिण पूर्वमधून ४, दक्षिण पश्चिममधून २, दक्षिण दिल्लीतून ४, शाहदरा येथून ४, बाहरी दिल्लीतुन १०, उत्तर पश्चिममधून १, उत्तर पूर्व जिल्ह्यातून ५३, उत्तरेकडील जिल्ह्यातून ३, एयरपोर्ट परिसरातून २, पूर्व दिल्लीतून ३ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. मध्य जिल्हा आणि उत्तरेबाहेरील परिसरातून कोणताही गुन्हेगारास बेड्या ठोकण्यात आल्या नाहीत.