‘बीएएमएस’ पदवीच्या नावे डॉक्टरला साडेतेरा लाखाने लावला चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2024 07:59 PM2024-03-04T19:59:09+5:302024-03-04T20:00:01+5:30
शहर पोलिसात गुन्हा नोंद
-चेतन बेले
वर्धा : कॉलेजात न जाता बीएएमएसची पदवी मिळवून देण्याचे आमिष देत इलेक्ट्रो होमिओपॅथी डॉक्टरला तब्बल १३ लाख ५० हजाराने चुना लावला. ही घटना बोरगाव मेघे येथे १ एप्रिल २०२१ ते ३ मार्च २०२४ दरम्यान घडली. याप्रकरणी डॉ. विशाल देवराव गाडेगोणे रा. बोरगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून राम लक्ष्मण पवार, व रमेश दांगट, रा. पुणे यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.
माहितीनुसार विशाल गाडेगोणे यांच्याकडे इलेक्ट्रो होमिओपॅथीची पदवी आहे. त्याचा आंजी येथे दवाखाना आहे. त्यांना महाविद्यालयात न जाता बीएएमएसची पदवी मिळवून देतो, असे नरेंद्र चंदनखेडे यांनी सांगितले. त्यांच्या परिचयातील राम पवार यांच्याशी त्यांनी ओळख करून दिली. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स, नाशिक येथे बीएएमएसची पदवी कॉलेजला न जाता मिळवून देतो, असे सांगून पार्ट पेमेंट केले तर २६ लाख लागेल आणि आधी पेमेंट केले तर साडेतेरा लाख रुपयात काम होईल, असे सांगत विश्वासात घेतले.
गाडेगोणे यांनी त्याच्या पत्नीच्या खात्यावरून साडेचार लाख रुपये राम पवार यांच्या खात्यावर पाठविले, तर मित्राच्या समक्ष राहत्या घरून दोन लाखांचा एक आणि ७ लाख रुपयांचा चेक असे ९ लाख रुपये दिले. आठवड्याभरात प्रवेश करून देतो, असे सांगितले. फसवणूक होत असल्याची शंका आल्याने त्यांनी पैसे परत करा, थेट डिग्री नको, असे म्हणताच पैसे परत मिळणार नाही, करायचे ते करून घे, असे म्हणत धमकी दिली. पैसे परत मागितले असता राम पवार यांनी बीएएमएस उत्तराखंड आयुर्वेदा विद्यापीठाच्या खोट्या मार्कशिट व्हॉट्सॲपवर पाठविल्या. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.