‘त्या’ गुंतवणूकदारांना मिळाले दोन कोटी परत...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 07:15 AM2022-10-12T07:15:15+5:302022-10-12T07:15:43+5:30
एस. कुमार ज्वेलर्स ॲन्ड डायमंड फसवणूक प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सोन्याच्या दागिन्याच्या खरेदी-विक्रीच्या होलसेल व्यवसायाच्या बहाण्याने मुंबईतील सराफांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या एस. कुमार ज्वेलर्स ॲन्ड डायमंड कंपनीचा मालक श्रीकुमार पिल्लई (६८) कडून जप्त केलेली रक्कम परत करण्यास पोलिसांना यश आले आहे. ११ जणांना तब्बल दोन कोटींची रक्कम परत करण्यात आल्यामुळे तक्रारदारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
पिल्लईने मुंबईतील काळबादेवीतील सराफांशी २०२० ते २०२१ मध्ये सोन्याच्या दागिन्याची खरेदी-विक्री होलसेल मध्ये व्यवसाय चालू होता. व्यवसायातून तक्रारदार व इतर व्यापाऱ्यांकडून सोन्याचे दागिने पिल्लईने घेतले होते. डिसेंबर २०२० पासून सोन्याचे दागिने (बांगड्या व इतर वस्तू) खरेदी करून सदर दागिन्यांचे पैसे परत देण्यास टाळाटाळ सुरू केली होती. तक्रारदार व सोने व्यापारी यांना ठरल्याप्रमाणे एकूण ४ कोटी २२ लाख ७४ हजार २७० रक्कम न देता पिल्लईने त्यांची फसवणूक केली. त्यानंतर, एस. कुमार ज्वेलर्स मालकाने भारतामध्ये विविध ठिकाणी असलेले १२ सोन्याची शोरूम अचानक बंद करून त्याने पळ काढल्याने तक्रारदार यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
२ कोटी ९ लाखांची रोकड ताब्यात
एलटी मार्ग पोलिसांनी त्याला गेल्या महिन्यात अटक केली. अटकेच्या वृत्तानंतर विविध भागातील तक्रारदार पुढे येत आहे. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर परिसरात ३ ते ४ दिवस कुरीअर बॉय, डिलीव्हरी बॉय, फेरीवाले असे वेषांतर करून पिल्लईला भाड्याच्या घरातून शिताफीने बेड्या ठोकल्या. तसेच, त्याच्या बीएमडब्ल्यूसह त्यातील २ कोटी ९ लाखांची रोकडहे जप्त केली. फसवणूक केलेली रक्कम तक्रारदार यांना परत करण्यासाठी न्यायालयाकडून आदेश प्राप्त होताच, ११ तारखेला ११ तक्रारदारांना त्यांची रक्कम पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या हस्ते परत करण्यात आले आहे.