अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या अडचणीत वाढ, कोर्टाने जारी केले वॉरंट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 07:52 PM2022-03-05T19:52:28+5:302022-03-05T19:55:20+5:30
Warrant against actress Sonakshi Sinha : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील शिवपुरी कॉलनी येथील रहिवासी इव्हेंट मॅनेजर प्रमोद शर्मा यांनी 30 सप्टेंबर 2018 रोजी दिल्लीच्या श्री फोर्ट ऑडिटोरियममध्ये इंडिया फॅशन अँड ब्युटी अवॉर्डचे आयोजन केले होते.
मुरादाबाद - अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी स्मिता गोस्वामी यांच्या न्यायालयाने शनिवारी बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यासह दोन जणांविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी वॉरंट जारी केले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 मार्च रोजी होणार आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील शिवपुरी कॉलनी येथील रहिवासी इव्हेंट मॅनेजर प्रमोद शर्मा यांनी 30 सप्टेंबर 2018 रोजी दिल्लीच्या श्री फोर्ट ऑडिटोरियममध्ये इंडिया फॅशन अँड ब्युटी अवॉर्डचे आयोजन केले होते. यामध्ये सोनाक्षी सिन्हा ठरलेल्या तारखेला पोहोचली नाही.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी प्रमोद शर्मा यांनी टॅलेंट फुलऑन आणि एक्साइड एंटरटेनमेंट कंपनीच्या माध्यमातून प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्याशी करार केला होता. यासाठी सोनाक्षीने एक प्रमोशनल व्हिडिओही जारी केला आहे. कार्यक्रमाला येण्यासाठी सोनाक्षी सिन्हाने 29.92 लाख रुपये वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये घेतले. टॅलेंट फुलऑनच्या अभिषेक सिन्हाला ६ लाख ४८ हजार रुपये देण्यात आले. नियोजित तारखेला त्याने सकाळी फोन करून सोनाक्षी सिन्हाच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी दुसऱ्या विमानाचे तिकीट काढले, असा आरोप आहे. मात्र, ती या कार्यक्रमाला पोहोचली नाही. सोनाक्षी सिन्हाच्या हस्ते 120 ब्युटी पार्लर चालकांना पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम होता.
मोठ्या संघर्षानंतर मुरादाबादचे तत्कालीन एसएसपी जे रवींद्र गौड यांच्या आदेशानुसार कटघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात फसवणूक केल्याच्या आरोपावरून कटघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ उपनिरीक्षक बिजेंद्र सिंग यांनी कायदेशीर मत घेऊन 20 मे 2020 रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रमोद कुमार यांचे वकील पीके गोस्वामी यांनी सांगितले की, हा खटला एसीजेएमच्या न्यायालयात सुरू आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सोनाक्षी सिन्हाने उच्च न्यायालयाकडून स्थगिती मागितली होती. परंतु, ही स्थगिती केवळ सहा महिन्यांसाठीच वैध होती. यासंदर्भात त्यांनी आपली बाजू न्यायालयासमोर मांडली. यानंतर कोर्टाने सोनाक्षी सिन्हा आणि अभिषेक सिन्हा यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे.
त्यांच्याविरुद्ध खटला सुरू आहे
सोनाक्षी सिन्हा (रा. ४९, रामायण, ९ वा मार्ग JVPD योजना, जुहू नवी मुंबई), अभिषेक सिन्हा स्वामी, टॅलेंट फुलऑन (रा. छत्रपती शिवाजी राजे कॉम्प्लेक्स महादा कांदिवली, पश्चिम मुंबई), एक्साइड एंटरटेनमेंट, सिल्व्हर पाल, वॉटरफील्ड रोड, बी. मुंबईतील रहिवासी मालविका पंजाबी, धुमिल ठक्कर, एडगर साकारिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.