अयोध्या बॉम्बने उडवून देण्याची मिळाली धमकी; सर्व प्रवेशस्थळं, प्रमुख मंदिरांवर कडक सुरक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 08:33 PM2021-12-02T20:33:32+5:302021-12-02T20:34:46+5:30
Threat of bomb attack in Ayodhya : अयोध्येतील सर्व प्रवेशद्वार, हॉटेल, धर्मशाळा आणि प्रमुख मंदिरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
अयोध्या - सोशल मीडियावर रामाची नगरी अयोध्या बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अयोध्येत सखोल तपासणी सुरू केली आहे. अयोध्येतील सर्व प्रवेशद्वार, हॉटेल, धर्मशाळा आणि प्रमुख मंदिरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
पोलिसांव्यतिरिक्त सीआरपीएफचे जवान आणि एटीएसचे पथक पूर्णपणे सक्रिय झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येत दहशतवादी हल्ला होण्याबाबत इनपुट मिळाल्यानंतर सतर्कता म्हणून पोलीस प्रशासनाने कारवाई केली आहे. सीओ अयोध्या आरके चतुर्वेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याच्या माहितीवरून शहरातील सर्व प्रवेशद्वारांवर सखोल तपासणी करण्यात येत आहे.
संवेदनशील मंदिरांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. संपूर्ण शहरात सीआरपीएफ आणि एटीएसची पथके सक्रिय ठेवण्यात आली आहेत. राम नगरीच्या सर्व प्रमुख ठिकाणी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. चतुर्वेदी पुढे म्हणाले की, अशा कोणत्याही धमकीबद्दल प्रशासनाकडे कोणतीही माहिती नाही, तरीही दक्षता वाढवण्यात आली आहे. त्याचवेळी अयोध्या बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याची मोठी माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अयोध्येत दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा कथित तरुण गुजरातमधील अहमदाबाद येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.