मुख्यमंत्र्यांच्या नावे १० लाखांसाठी धमकी; ज्योतिषाची पोलिस उपायुक्तांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 08:30 AM2024-07-05T08:30:38+5:302024-07-05T08:30:56+5:30

कालांतराने श्रीनिवास शेट्टी, सुरेश रेड्डी यांनी भट्टर यांच्याकडे पैशांची मागणी केली. 

Threat for 10 lakhs in favor of Chief Minister; Jyotish's complaint to the Deputy Commissioner of Police | मुख्यमंत्र्यांच्या नावे १० लाखांसाठी धमकी; ज्योतिषाची पोलिस उपायुक्तांकडे तक्रार

मुख्यमंत्र्यांच्या नावे १० लाखांसाठी धमकी; ज्योतिषाची पोलिस उपायुक्तांकडे तक्रार

ठाणे - मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन ठाण्यातील परशुराम भट्टर या  ज्योतिषाला संकेत पुजारा याने १० लाखांच्या खंडणीसाठी धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त शिवराज पाटील यांच्याकडे त्यांनी तक्रार केली आहे. या प्रकरणी कारवाई करा, अशी मागणी केल्याचे भट्टर यांनी गुरुवारी सांगितले. 

ठाणे रेल्वे स्थानकासमोरील ठाकोर इमारतीमध्ये भट्टर हे कुंडली पाहण्याचे काम करतात. त्यांच्याकडे नियमितपणे ज्योतिष आणि कुंडली पाहण्यासाठी बेंगळुरू येथील श्रीनिवास विठ्ठल शेट्टी यायचे. त्यांच्या परिचयाचे सुरेश व्यंकटेश रेड्डी हेदेखील भट्टर यांच्याकडे येत होते. भट्टर यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे रेड्डी यांची भरभराट होत असल्याने भट्टर यांना चारचाकी वाहन घेण्यासाठी काही रक्कम भेट म्हणून दिली होती. ही रक्कम कधीच परत करू नका, असेही रेड्डी यांनी सांगितले होते. कालांतराने श्रीनिवास शेट्टी, सुरेश रेड्डी यांनी भट्टर यांच्याकडे पैशांची मागणी केली. 

कारवाईची मागणी
भट्टर यांनी ३० लाखांचे तीन धनादेश रेड्डी यांनी सांगितल्यानुसार सुरेश व्ही. या नावाने दिले. दोन धनादेश वठल्यानंतर बँक खात्यात पैसे आले नाहीत, असा कांगावा करीत रेड्डी यांनी तिसरा धनादेश थांबविण्यास  सांगून पनवेल येथील माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांना उर्वरित १० लाख देण्यास सांगितले.

त्यानुसार भट्टर यांनी पाच लाखांचे दोन धनादेश दिले. ५ जून  रोजी संकेत पुजारा याने भट्टर यांच्या कार्यालयात येऊन, तू मुख्यमंत्र्यांच्या नावावर खूप कमाई केली आहेस. मी एकनाथ शिंदे यांचा खास माणूस असून, माझ्यासोबत त्यांचा ड्रायव्हर आला आहे. तू रेड्डी यांची फसवणूक केली असून, प्रकरण संपविण्यासाठी १० लाख दे. नाहीतर, वाट लावेन, अशी धमकी त्याने दिली.  या प्रकरणी भट्टर यांनी पोलिस उपायुक्त  पाटील यांची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला. तशी लेखी तक्रारही त्यांच्याकडे केली. मुख्यमंत्री हे चांगले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी  अशा पद्धतीने धमकी देणाऱ्यावर कारवाईची मागणी भट्टर यांनी केली.

Web Title: Threat for 10 lakhs in favor of Chief Minister; Jyotish's complaint to the Deputy Commissioner of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.