व्यापाऱ्याला लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकी; 20,000 च्या खंडणीसाठी पाठवला QR कोड
By पंकज पाटील | Published: March 27, 2023 04:31 PM2023-03-27T16:31:59+5:302023-03-27T16:32:12+5:30
या प्रकाराने गोंधळात पडलेल्या परबतसिंग चुडावत यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना याबाबतची माहिती दिली
अंबरनाथ - अंबरनाथमधील एका ज्वेलर्स व्यापाऱ्याला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने चक्क २० हजारांच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा फ्रॉड कॉल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे धमकवणाऱ्या आरोपीने संबंधित व्यक्तीला क्यूआर कोड पाठवून 20 हजार रुपये तात्काळ पाठवण्यास सांगितले होते.
अंबरनाथच्या महालक्ष्मी नगर परिसरात परबतसिंग चुडावत यांचे देव भैरव ज्वेलर्स नावाचे सोन्याचांदीचे दुकान आहे. चुडावत यांना २३ मार्च रोजी एक व्हॉट्सऍप कॉल आला, ज्यावर समोरच्या व्यक्तीने आपण लॉरेन्स बिष्णोई गॅंगकडून बोलत असल्याचे सांगत २० हजार रुपये खंडणी मागितली. तसेच २० हजार रुपये न दिल्यास मुलीचे अपहरण करू, त्यानंतर २० लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी त्याने दिली. २० हजार रुपये पाठवण्यासाठी धमकी देणाऱ्याने चक्क क्यूआर कोड पाठवला. या प्रकाराने गोंधळात पडलेल्या परबतसिंग चुडावत यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी क्यूआर कोडवरून समोरील व्यक्तीचा नंबर मिळवला असता तो दिल्लीचा असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने अधिक तपास केला असता हा फ्रॉड कॉल असल्याचे समोर आले. यानंतर आता हा कॉल करणाऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे. सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी असलेला लॉरेन्स बिष्णोई त्याच्या नावाचा वापर करून दहशत माजवण्याचा हा प्रयत्न असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे