अंबानी-अमिताभ-धर्मेंद्रचे घर उडविण्याची धमकी; निनावी फोन, मुंबई पोलिसांचा दुजोरा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 06:27 AM2023-03-01T06:27:42+5:302023-03-01T06:27:58+5:30
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी या संदर्भातील फोन आल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर/मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी, चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन व धर्मेंद्र यांचे घर उडविण्याची धमकी देण्याचा फोन नागपूर पोलिसांना आल्याची चर्चा पसरल्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली होती. नागपूर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला या संदर्भात फोन आला होता. त्यानंतर, तातडीने याची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आल्याचा दावा करण्यात येत होता. नागपुरातील पोलिस अधिकाऱ्यांनी असे काही झाले नसल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात ११२ या क्रमांकावर नवी मुंबईतील नियंत्रण कक्षात थेट फोन गेल्याचा दावा काही सूत्रांनी केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी या संदर्भातील फोन आल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. नागपूर नियंत्रण कक्षाला फोन आल्याचा दावा मुंबईतील अधिकाऱ्यांनी केला. मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेले ॲंटिलिया, तसेच अमिताभ बच्चन यांचे निवासस्थान बॉम्बने उडविण्याची त्याने धमकी दिली. या व्हीआयपी व्यक्तींच्या घरासमोर बॉम्ब लावण्यात आले असून, त्याचप्रमाणे मुंबईतील दादरमध्ये शस्त्रास्त्रांसह २५ दहशतवादी शिरल्याचा दावा करण्यात आला. नागपूर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांनी मात्र असे काही झाले नसल्याची माहिती दिली.
परंतु मुंबईतील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ११२ या पोलिस तक्रार क्रमांकाचा केंद्रीय नियंत्रण कक्ष नवी मुंबई येथे आहे. त्यामुळे तेथेच थेट संबंधित फोन गेला व तो ‘ट्रेस’ झाल्यानंतर त्याची माहिती नागपुरातील काही अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
निवासस्थानांच्या सुरक्षेत वाढ
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी या धमकीला गंभीरतेने घेतले आहे. मुकेश अंबानी यांच्या ॲंटालियासह अमिताभ बच्चन व धर्मेंद्र यांच्या निवासस्थानांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय बॉम्बशोधक पथकेदेखील पाठविण्यात आली.