अश्लील व्हिडीओ तयार करून व्हायरल करण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 01:48 AM2018-12-22T01:48:56+5:302018-12-22T01:49:06+5:30
महिलेवर लैंगिक अत्याचार करून अश्लील व्हिडीओ तयार केला. याबाबत कोणाला काही सांगितल्यास हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली.
पिंपरी : महिलेवर लैंगिक अत्याचार करून अश्लील व्हिडीओ तयार केला. याबाबत कोणाला काही सांगितल्यास हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली. किरण कृष्णा भालेकर (वय ४२, रा. सोमनाथनगर, वडगाव शेरी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चिखली येथील ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित महिलेचे लग्न झाले असून, ती एका आयटी कंपनीत कामाला आहे. तिच्या पतीच्या माध्यमातून आरोपीची व फिर्यादी महिलेची ओळख झाली होती.
दरम्यान, ‘‘मोठ्या कॉलेजचे अधिकारी माझ्याकडे येणार असून, त्यांच्याकडून आपल्याला आगामी काळात चांगली कामे मिळतील,’’ असे आमीष दाखवून आरोपीने पीडित महिलेला डांगे चौकातील एका हॉटेलवर बोलावून घेतले. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’ असे म्हणत शरीर संबंध ठेवण्याची मागणी केली. तसेच संबंध ठेवल्यास मूल होईल, असे सांगत महिलेशी जवळीक साधत तिच्या इच्छेविरुद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराचा व्हिडीओ तयार केला. तसेच याबाबत कोणाला काही सांगितल्यास हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक ए. बी. शेटे करीत आहेत.
हॉटेलात डांबून ठेवले
पीडित महिलेला आरोपीने
बराच वेळ हॉटेलच्या खोलीत डांबून ठेवले. याबाबत वाकड ठाण्यात तक्रार दिल्यानंतर भालेकर याला पोलिसांनी अटक केले असून, न्यायालयात हजर केले. २६ डिसेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.