माझ्या कुटुंबाला देवेन भारतींपासून धोका, पोलीस सुरक्षा पुरवा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 02:17 PM2021-12-29T14:17:50+5:302021-12-29T16:09:11+5:30
Ex police officer demanding Security : २७ डिसेंबरला राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पत्र देत कुरुलकर यांनी मागणी केली आहे.
मुंबई: मला आणि कुटुंबाला आयपीएस अधिकारी देवेन भारतींपासून धोका असून सुरक्षा पुरविण्याची मागणी आय ब्रांचचे माजी पोलीस निरीक्षक आणि तक्रारदार दिपक कुरुलकर यांनी केली आहे. २७ डिसेंबरला राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पत्र देत कुरुलकर यांनी मागणी केली आहे.
27 डिसेंबर 2021 रोजी दीपक कुरुलकर यांनी पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पत्र लिहून स्वत:ला आणि त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. कुरुलकर यांनी संजय पांडे यांच्यासह त्यांचे वकील नितीन सातपुते आणि अरुणा चौधरी यांचीही भेट घेतली. यापूर्वी कुरुळकर यांनी सहपोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे यांचीही भेट घेतली होती आणि देवेन भारती यांच्याकडून धोका होण्याची भीती व्यक्त केली होती.
दीपक कुरुलकर हे मुंबई पोलिसांचे निवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक आहेत. ते ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात राहतात. दीपक कुरुलकर यांच्या तक्रारीवरून पोलीस अधिकारी देवेन भारती, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक फटांगरे आणि बांगलादेशी महिला रेश्मा खान यांच्याविरुद्ध मालवणी पोलिस ठाण्यात १० डिसेंबर २०२१ रोजी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आता क्राइम ब्रँच युनिट सीआययू करत आहे.