दाऊदच्या नावाने ठाण्याच्या महापौरांना धमकी; हिशोबात रहायचं अन्यथा उचलून नेऊ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 09:11 PM2019-09-18T21:11:09+5:302019-09-18T21:19:26+5:30
ठाणे महापालिकेत खळबळ
ठाणे - ‘तुम्ही नीट राहिले नाही तर तुम्हाला उचलून नेऊ आणि तुमच्या कुटूंबियांना त्रास देऊ, तुम्ही हिशोबात रहायचे’ असे आव्हान देत थेट ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम कासकरच्या नावाने धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री घडला आहे. याप्रकरणाने संपूर्ण ठाणे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली असून महापौर शिंदे यांनी याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ठाण्याच्या महापौर शिंदे यांनी याप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये त्यांच्या मोबाइलवर 17 सप्टेंबर रोजी रात्री 11.16 ते 11.50 वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने डोंगरीवरुन दाऊदचा माणूस बोलत असल्याचा दावा केला. सुरुवातीला धमकी देणाऱ्याने ‘तुम्ही मीनाक्षी शिंदे बोलता का? अशी विचारणा केली. त्यावर महापौरांनी होकारार्थी उत्तर देत काय काम आहे? असेही विचारले. त्यावेळी समोरच्या व्यक्तीने दाऊदच्या नावाने त्यांना धमकावले. तुम्ही ठाण्यात खूप भांडणं करता, व्यवस्थित रहात नाही. नीट राहिले नाहीतर तुम्हाला उचलून नेऊ, अशी धमकी दिली असं नमूद केलं आहे. तसेच या धमकीमुळे प्रचंड धास्तावलेल्या महापौरांनी तातडीने कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अलिकडेच महापौर विरुद्ध प्रशासन असाही वाद चांगलाच पेटला होता. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी महापौरांचेही नाव चर्चेत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर थेट दाऊद इब्राहिम किंवा छोटा शकील यांच्या नावाने महापौरांना कोण धमकी देऊ शकते? असे अनेक तर्कवितर्क केले जात आहेत.