जादूटोणा करून कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची धमकी; महिलेला लुबाडणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 08:14 PM2020-07-06T20:14:41+5:302020-07-06T20:15:24+5:30
मुलाने त्याच्या मित्राला दिलेले सोन्याचे दागिने परत मिळवून देतो, असे सांगून जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आला..
पुणे : मुलाने त्याच्या मित्राला दिलेले सोन्याचे दागिने परत मिळवून देतो, असे सांगून जादूटोणा करून कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. समर्थ पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिलेच्या मुलाचे दागिने मित्र परत करत नव्हता. आरोपी सुनीता सोनी व इतर दोघांनी दागिने परत मिळविण्यासाठी देवीची पूजा करून प्रसन्न करावे लागेल, असे सांगितले. त्यासाठी पैसे घेतले. आणखी पैसे देण्यास नकार दिल्यावर जादूटोण्याद्वारे कुटुंब उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. पोलिसांनी खंडणी, फसवणूक तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी कुप्रथा व जादूटोणा कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शिवाजीनगर येथील एका ३८ वर्षांच्या सफाई कामगार महिलेने फिर्याद दिली असून, हा प्रकार सोमवार पेठ पोलीस अधिकारी वसाहतीत डिसेंबर २०१९ ते ५ जुलै २०२० दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : या महिलेच्या मुलाने मित्राला सोन्याचे दागिने दिले होते. तो ते दागिने परत देत नव्हता. या महिलेची जोगवा मागणाऱ्या सुनीता पवळे ऊर्फ सोनी हिच्याबरोबर ओळख झाली. हे दागिने परत मिळविण्यासाठी देवीची पूजा करून तिला प्रसन्न करावे लागेल, असे फिर्यादी महिलेला सांगण्यात आले. त्यासाठी या महिलेकडून वेळोवेळी २ हजार, ३ हजार रुपये घेतले. अशा प्रकारे तिच्याकडून आतापर्यंत १५ हजार रुपये घेतले. त्यानंतरही ते पैसे मागत होते. तेव्हा या महिलेने पैसे देण्यास नकार दिल्यावर तिला व तिच्या कुटुंबीयांची जादूटोणाद्वारे कुटुंब उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. या प्रकाराने या महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर, तिने समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी खंडणी, फसवणूक तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी कुप्रथा व जादूटोणा कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.