उरणच्या खोपट पुलावर धमकीचा संदेश; एकजण पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 08:01 PM2019-06-06T20:01:41+5:302019-06-06T20:05:45+5:30
या व्यक्तीने धमकीचा संदेश लिहिल्याची कबुली दिल्याचंही समजत आहे.
नवी मुंबई - उरणच्या खोपट गावातील पुलावर धमकी देणारा संदेश लिहिल्याच्या प्रकरणात एका व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या व्यक्तीने धमकीचा संदेश लिहिल्याची कबुली दिल्याचंही समजत आहे.
नवी मुंबईतील उरणजवळील खोपट गावातील खोपटे पुलावर मंगळवारी अतिरेकी संघटना आयसिस, अतिरेकी अबू बकर अल बगदादी आणि २६/११ चा मास्टर माईंड हाफिस सईद यांचं समर्थन करणारा एक संदेश लिहिण्यात आला होता. या संदेशनंतर नवी मुंबईसह मुंबई, ठाणे आणि पालघर, संपूर्ण राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि अनेकांची चौकशी केली. त्यात खोपट गावातील एका व्यक्तीला आज सकाळी ताब्यात घेण्यात आलं. ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती मूळ उत्तर प्रदेशची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या व्यक्तीने चौकशीदरम्यान पुलाखाली चित्र काढल्याचं कबूल केलं आहे. त्याचप्रमाणे ही व्यक्ती मनोरुग्ण असल्याचंही तपासात पुढे येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे गोळा केले आहेत. या पुलाजवळ अनेक मद्यपी येत असल्याची माहितीही गावकऱ्यांनी दिली. चौकशीत हे कृत्य संबंधीत व्यक्तीने केल्याचं स्पष्ट झाल्यावर त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिली.
Navi Mumbai ISIS graffiti case: A man has been detained by Police. He is mentally challenged and is currently under treatment at DY Patil Hospital. Further investigation is underway
— ANI (@ANI) June 6, 2019