लोणी काळभोर येथे जमीन प्लॉटिंग वादात डोक्याला पिस्तुल लावत जीवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 01:34 PM2019-02-04T13:34:05+5:302019-02-04T13:35:06+5:30
जमीन प्लॉटिंगसाठी घेण्यावरून झालेल्या वादामुळे शिवीगाळ व मारहाण करत डोक्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
लोणी काळभोर : राहु (ता. दौंड ) येथील ३८ गुंठे जमीन प्लॉटिंगसाठी घेण्यावरून झालेल्या वादामुळे शिवीगाळ व मारहाण करत डोक्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
याप्रकरणी बाळासाहेब शिंदे ( रा. बोरी भडक, ता. दौंड ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या संदर्भात तेजस रंगनाथ म्हेत्रे ( वय. २३, रा. सहजपूर, ता. दौंड ) याने लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेतीसह प्लॉटिंगचा व्यवसाय करतात. २९ जानेवारी रोजी या दोघांनी मकसूद शेख यांची राहू ( ता. दौंड ) येथील ३८ गुंठे जमिनीचे ताबा साठेखत केडगाव ( ता. दौंड ) येथील दुय्यम निबंधक कार्यालयात करून घेतले होते. त्याचा भाऊ महेश, मित्र राजू सुर्यवंशी व बाळासाहेब शिंदे उरुळी कांचनमधील एका हॉटेलमध्ये भेटले. चर्चेत तेजस व महेशने आपण मित्र आहोत. आपल्यात भांडण नको. तो प्लॉट आम्ही घेतला आहे असे बाळासाहेब शिंदेला सांगितले. यावेळी शिंदेने चिडून शिवीगाळ करून तेजसला हाताने मारहाण केली. कमरेचा पिस्तूल काढून तेजसच्या डोक्याला लावला व माझ्या प्लॉटिंगमध्ये पडतोस काय, तुला आता जिवंत ठेवणार नाही अशी धमकी आरोपीने फिर्यादींना दिली. तेवढ्यात राजू सुर्यवंशीने त्याच्या हातावर फटका मारला. त्यामुळे पिस्तूल खाली पडले. पुढील तपास पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले करीत आहेत.