कंपनीतील स्क्रॅप उचलण्याच्या कारणावरून ५० हजारांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 02:26 PM2019-11-19T14:26:06+5:302019-11-19T14:27:00+5:30
जर तुला ठेका पाहिजे असेल तर महिना ५० हजार आम्हाला द्यावे लागतील अन्यथा तुला जीवे मारले जाईल, अशी धमकी दिली.
भिगवण : बिल्ट कंपनीतील स्क्रॅप उचलण्याच्या कारणावरून बेकायदा जमाव जमवून ५० हजार रुपयाची खंडणी मागितली. तसेच फिर्यादीला धक्काबुक्की करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोंधवडी गावच्या माजी सरपंचासह ६ जणांविरोधात खंडणीसह इतर गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती भिगवण पोलीस सूत्रांनी दिली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोंधवडी गावच्या हद्दीत असणाऱ्या बिल्ट कागद कंपनीत शिरवळच्या कॉन्ट्रॅक्टरने स्क्रॅप उचलण्याचे ठेका घेतला आहे.तर पोंधवडी गावचे गणेश दत्तात्रय पवार यांनी सबंधित ठेकेदाराकडून करार करत काम सुरु करण्याच्या उद्देशाने दोन गाड्या तसेच काही मजुरांना सोबत घेत कंपनीमध्ये प्रवेश करण्याच्या वेळी पोंधवडी गावचे माजी सरपंच नाना अर्जुन बंडगर ,नवनाथ उर्फ बिट्टू अर्जुन बंडगर ,निलेश दतात्रय बंडगर ,रामभाऊ तात्या बंडगर ,बापू हनुमंत करे ,आप्पा सवाणे यांनी गाड्या अडवून शिवीगाळ करीत स्क्रॅप उचलण्यास विरोध केला.यावेळी गणेश पवार यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करीत 'तू , जर हा ठेका सोडला नाहीतर आमचे महिन्याला ५० हजार रुपयाचे नुकसान होणार आहे.त्यामुळे जर तुला ठेका पाहिजे असेल तर महिना ५० हजार आम्हाला द्यावे लागतील अन्यथा तुला जीवे मारले जाईल, अशी धमकी दिली.यावेळी संबंधितांनी पवार यांनी आणलेल्या लेबरला शिवीगाळ करीत आणि धक्काबुक्की करीत मारण्याची धमकी देत घाबरविण्याचा प्रयत्न केला.तसेच स्क्रॅप वाहतुकीसाठी आणलेली वाहनाची चाव्या हिसकावून घेत वाहने बळजबरीने ताब्यात घेत दुसऱ्या ठिकाणी नेली.त्यामुळे गणेश पवार यांनी भिगवण पोलीस ठाण्यात धाव घेत पोंधवडी गावच्या माजी सरपंचासह ६ जनाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
चौकट
शिक्रापूर शिरूर आणि चाकण या एम.आय .डी.सी.भागातील कारखानदारीत पेटत असलेला स्क्रॅपचा ठेका आता पोंधवडी सारख्या ग्रामीण भागातही चर्चेत येत असल्यामुळे स्क्रॅपखाली नक्की दडलय काय असा सवाल सामान्य नागरिकांच्या मनात कुतूहल जागे करीत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी ओद्योगिक परिसरात होणारी गुंडगिरी खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगत कंपनीच्या माध्यमातून अनेकांचे संसार उभे राहिलेले असतात त्यामुळे काहींच्या स्वाथार्साठी याला गालबोट लागू दिले जाणार नाही .तसेच ओद्योगिक परिसरात शांतता हाच पोलिसांचा अजेंडा असून वातावरण बिघाडविण्याचा प्रयत्न करणारा विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिली.