विद्यापीठातील मुलींना विदेशातून फोनवर धमक्या, ‘तुमचेही व्हिडीओ आहेत, व्हायरल करू’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 10:52 AM2022-09-20T10:52:49+5:302022-09-20T10:53:59+5:30
‘तुमचेही व्हिडीओ आहेत, व्हायरल करू’
मोनिका गुप्ता
चंडीगड : चंडीगड विद्यापीठ व्हिडिओ व्हायरल प्रकरणाचे पदर हळूहळू उलगडत आहेत. यामागे परदेशातील काहींचा हात असल्याचे सांगण्यात येते. वसतिगृहातील काही मुलींना कॅनडातील नंबरवरून आंतरराष्ट्रीय फोन आले. तुमचेही व्हिडिओ आहेत. ते आता व्हायरल करू, असे फोन करणाऱ्याने विद्यार्थिनींना धमकावले. यामुळे विद्यार्थिनींत दहशत पसरली आहे. अटक केलेल्या तिघांना सोमवारी कोर्टात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
२ मिनिटे ८ सेकंदाचा फोन
चंडीगड विद्यापीठाच्या वसतिगृहातील मुलींना १(२०४)८१९-९००२ या नंबरवरून फोन आला. फोन करणारा जवळपास दोन मिनिटे आठ सेकंद धमकावत होता की, तुझाही व्हिडिओ आहे, व्हायरल केला जाईल.
फोनवर झालेले संभाषण
विद्यार्थिनी : हॅलो .. कोण?
फोन करणारा : तू बापाशी बोल.
विद्यार्थिनी : तू फोन का केला?
फोन करणारा : तुझाही व्हिडिओ आहे, बिनडोक.
विद्यार्थिनी : माझा कुठला व्हिडिओ आहे सांग, एवढा दम नाही का?
फोन करणारा : प्लॅन तयार आहे.
विद्यार्थीनी : कशाचा प्लॅन ?
फोन करणारा : कानात काय घातलेय, साप घुसला का?
विद्यार्थिनी : कशाचा प्लॅन, कोण बोलतंय?
फोन करणारा : चल.. आणि यानंतर फोन बंद झाला. फोन करणाऱ्याने अत्यंत अश्लाघ्य भाषेचा वापर केला.