मौजमजेसाठी वाहनचोरी करणारे तिघे जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 07:53 PM2019-08-07T19:53:55+5:302019-08-07T19:54:49+5:30
दोन रिक्षा, चार दुचाकी अशी ५ लाख २५ हजार रुपये किमतीची सहा वाहने चोरले.
पिंपरी : मौजमजेसाठी वाहनचोरी करणाऱ्या तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या खंडणी, दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून दोन रिक्षा व १० दुचाकी अशी ७ लाख ८५ हजारांची १२ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी, दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे व अनिकेत हिवरकर पथकासह निगडीत गस्त घालत होते. त्या वेळी पोलीस नाईक निशांत काळे यांना माहिती मिळाली की, वाहन चोरी करणारा आरोपी प्रवीण चंद्रकांत भंडारी (वय २०, रा. निगडी) हा निगडी आॅटोस्कीम येथे थांबला आहे. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. तो आणि त्याचा मित्र अमोल उर्फ बाळा अनंत जाधव (वय १९, रा. साने कॉलनी, चिखली) असे दोघे मिळून वाहन चोरी करत असल्याचे त्याने चौकशी दरम्यान सांगितले. त्यानुसार पोलिसांनी अमोल जाधव यालाही ताब्यात घेतले. दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी दोन रिक्षा, चार दुचाकी अशी ५ लाख २५ हजार रुपये किमतीची सहा वाहने चोरल्याचे सांगितले. त्यांच्याकडून ही वाहने जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या वाहनांपैकी चार वाहनांच्या चोरीबाबत चिखली, निगडी, सांगवी या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल आहे. उर्वरित दोन वाहनांबाबत पोलिस तपास करत आहेत. आरोपी प्रवीण भंडारे याच्यावर उस्मानाबाद येथील तुळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे पथकासह पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा तपास करत होते. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की, आरोपी सागर उर्फ लाला गगलानी (वय २९, रा. साईचौक, पिंपरी) याच्याकडे चोरीची दुचाकी असून तो डेअरी फार्मकडील रस्त्याने कालभैरवनाथ मंदिराकडे जात आहे. त्यानुसार सापळा रचून आरोपीला दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता मौजमजेसाठी पिंपरी परिसरातून त्याने २ लाख ६० हजार रुपये किमतीच्या सहा मोपेड दुचाकी चोरल्याचे कबूल केले. आरोपी सागर गगलानी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात २०१२ मध्ये गुन्हा दाखल आहे. काही कामधंदा नसल्याने वाहने चोरून त्यांच्या नंबरप्लेट बदलून त्यांची विक्री करायची किंवा कोणाकडे तरी गहाण ठेवून पैसे मिळवायचे. त्यातून मिळालेल्या पैशाने आरोपी गगलानी मौजमजा करायचा.
वाहन चोरी रोखण्यासाठीची उपाययोजना
* वाहन सुरक्षित ठिकाणी व प्रकाशात पार्किंग करावे
* वाहनाला सहज दिसणार नाही अशा ठिकाणी जीपीएस यंत्रणा बसवावी
* वाहनाचे लॉक चांगल्या दजार्चे असावे
* वाहनात आवश्यक तेवढेच इंधन ठेवावे
* दुचाकी वाहनांना साखळी लॉक बसवावे
* वाहनाच्या काचेवर नंबर इचिंग (कोरून) घ्यावेत
* पार्किंगमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत