जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक, नायगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 04:45 PM2024-10-02T16:45:26+5:302024-10-02T16:45:43+5:30
नायगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
- मंगेश कराळे
नालासोपारा : जबरी चोरी करणाऱ्या ३ आरोपींना अटक करण्यात नायगांव गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी श्रीकांत कारंडे यांनी बुधवारी दिली आहे. मालाडच्या सह्याद्री अपार्टमेंटमध्ये राहणारे कबीर सय्यद (४४) यांना सोबत असलेले अरमान व जयप्रकाश या तिघांना २१ सप्टेंबरला रात्री ३ वाजण्याच्या सुमारास चार आरोपींनी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बाफाणे ब्रीज जवळील एनी टाईम फूड हॉटेल जवळ लोखंडी रॉडने मारहाण केली.
या मारहाणीत अरमानच्या उजव्या हाताचे हाड व डाव्या हाताचे अंगठ्याचे हाड फॅक्चर झाले. तसेच कबीर आणि जयप्रकाशला किरकोळ दुखापत झाली. आरोपींनी कारचे नुकसान करत कारमधील १३ हजार रोख रुपये आणि जयप्रकाशचा मोबाईल जबरीने खेचुन चोरून पळून गेले. या घटनेत कबीर यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चेन गहाळ झाली होती. नायगांव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने तसेच घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज नसल्याने गुन्हा उघडकीस आणणे एक कसोटी होती. परंतु वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेच्या अनुशंगाने नायगावच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वेगवेगळ्या टीम बनवून मुंबई-अहमदाबाद महामार्ग तसेच आजुबाजुच्या परिसरातील १०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज व बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी नाजीम सिध्दकी (३३), उजेफा शेख (२२) आणि कुमार उर्फ कल्पेश भोईर (३२) यांनी केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींना ताब्यात घेवून कौशल्यपूर्ण चौकशी केल्यावर सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने अटक करण्यात आली. आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या १० लाख रुपये किंमतीची इनोव्हा कार जप्त केली आहे. वरील कामगिरी पोलीस उपायुक्त पौणिमा चौगुले - श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे, नायगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सागर टिळेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सपोनि गणेश केकान, रोशन देवरे, पोलीस अंमलदार सचिन ओलेकर, सचिन मोहिते, सचिन खंताळ, जयवंत खंडवी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील, पांडुरंग महाले यांनी केली आहे.