तरुणाची हत्या करणाऱ्या तीन आरोपींना ४८ तासांत अटक; गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 05:51 PM2022-11-16T17:51:59+5:302022-11-16T17:52:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा :- मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ वर्षीय तरुणाची गावठी पिस्तुलने फायरिंग करून हत्या केल्याप्रकरणी तीन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा :- मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ वर्षीय तरुणाची गावठी पिस्तुलने फायरिंग करून हत्या केल्याप्रकरणी तीन आरोपींना ४८ तासांत पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. ही माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली आहे. आरोपीकडून १ अग्निशस्त्र, ३६ जिवंत काडतुसे, मोबाईल हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास तिल्हेर धुमाळपाडा येथील वीट भट्टी जवळील जाधवपाड्याकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर वाकणपाड्याच्या रफिक कंपाऊंड येथे राहणाऱ्या कमरुद्दीन चौधरी (२१) या तरुणाचा मृतदेह सापडला होता. घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत नेमकी हत्या कशी झाली याकरिता मृतदेह शवविच्छेदनसाठी जे जे रुग्णालयात पाठवला होता. डॉक्टरांनी तरुणाच्या डोक्यात अग्निशस्राने फायरिंग केल्याने मृत्यू झाल्याचा अभिप्राय दिला. सदर गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे होते. हा गुन्हा उघड करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या होत्या. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून वाकणपाडा येथील कमरुद्दीनच्या नातेवाईक, मित्रांकडे चौकशी सुरू केली. कमरुद्दीन हा त्याच परिसरातील मोहम्मद सुफियान शेख याच्यासोबत भिवंडीला गेल्याची खात्रीशीर माहिती युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे यांना मिळाली.
युनिट दोनने मोहम्मद सुफियान शेख याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर पैश्याच्या हव्यासापोटी मित्र नदीम शेख आणि जिसान उर्फ सोनू खान याच्या मदतीने कमरुद्दीनला भिवंडी येथे भंगाराचा माल दाखविण्याचा बहाणा दुचाकीवरून घटनेच्या दिवशी नेले. भिवंडी रोडवर येत असताना कमरुद्दीनला दुचाकीवर मध्ये बसवून चालत्या दुचाकीवर नदीम याने गावठी पिस्तुलने त्याच्या डोक्यावर मागच्या बाजूने दोन फायर करून त्याचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी जिसान उर्फ सोनूला ताब्यात घेतले. गावी रेल्वेने नदीम पळून जात असल्याची माहिती मिळाल्यावर भुसावळ रेल्वे पोलिसांना माहिती देऊन त्याला भुसावळ रेल्वे स्थानकात पकडले आहे. गुन्ह्यात वापरलेले अग्निशस्त्र आणि जिवंत काडतुसे त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे.
तरुणाच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी तीन आरोपींना ४८ तासांत अटक करून गुन्ह्याचा उलगडा केला आहे. तिन्ही आरोपींना वसई न्यायालयात हजर केल्यावर सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - अविनाश अंबुरे (पोलीस उपायुक्त, गुन्हे विभाग)