दोन वयोवृद्धांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2024 03:45 PM2024-02-23T15:45:18+5:302024-02-23T15:45:58+5:30
वसई पोलीस ठाणेची कामगिरी
- मंगेश कराळे
नालासोपारा:- दोन वयोवृद्ध नागरिकांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात वसई पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शुक्रवारी दिली आहे.
वसई पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात राहणारे सिल्वेस्टर परेरा है १७ फेब्रुवारीला पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मॉर्निग वॉकसाठी घराबाहेर पडले. तेव्हा त्यांच्या भावाच्या घराबाहेर २ अनोळखी मुले व १ अनोळखी महिला आपपसात भांडण करून आरडाओरड करीत होते. सिल्वेस्टर यांचे भाऊ त्यांना समजण्यासाठी गेले असता त्या तिघांनी त्यांना मारहाण केली. हे पाहून सिल्वेस्टर भांडण सोडवण्यासाठी गेल्यावर तू आमच्यातील भांडण सोडवणारा कोण आलास तुला आता जीवे मारतो असे बोलून तिघांनी त्यांना व त्यांच्या भावाला जीवे ठार मारण्याचे उद्देशाने त्यांच्या डोक्यात जोराने वारंवार दगडाने मारुन व डोळ्यास कोणत्यातरी हत्याराने मारून जखमी केले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वसई पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व अंमलदार तसेच तपास अधिकारी यांचे ३ पथक तयार करून चार दिवस सतत प्रयत्न करून तांत्रीक विश्लेषण व मिळालेल्या माहितीचे आधारे गुन्ह्यातील आरोपींची नावे निष्पन्न करून तिन्ही आरोपींना अर्नाळ्याच्या नंदाखाल येथून अटक केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौणिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांचे मार्गदर्शनाखाली वसईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित आंधळे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) अब्दुलहक देसाई, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि सुनील पवार, सागर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राहुल फड, पोलीस हवालदार सुनिल मलावकर, मिलिंद घरत, रमेश पोटे, सूर्यकांत मुंडे, अक्षय नांदगावकर, सौरभ दराडे, प्रशांत आहेर, अमोल बरडे, सोनल शेळके यांनी केलेली आहे.