साडेतीन कोटींचे अमलीपदार्थ जप्त; गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 02:26 AM2019-06-02T02:26:44+5:302019-06-02T02:27:00+5:30
बाहरीलाल खत्री याच्याकडून नेपाळ येथून आयात केलेले १ किलो अफीम हस्तगत करण्यात आले. त्याची किंमत अंदाजे १० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले
मुंबई : शहर व उपनगरांत अमलीपदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई सुरू केली असून गेल्या बारा दिवसांमध्ये तब्बल साडेतीन कोटी रुपये किमतीचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत सहा परदेशी नागरिकांसह एकूण ९ जणांना अटक केली आहे. अमलीपदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहरीलाल खत्री याच्याकडून नेपाळ येथून आयात केलेले १ किलो अफीम हस्तगत करण्यात आले. त्याची किंमत अंदाजे १० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. दक्षिण मुंबईतील पी.डीमेलो मार्गावर ही कारवाई करण्यात आली. तर २९ मे रोजी एका परदेशी नागरिकाला अटक करून वांद्रे शाखेच्या पथकाने ३ कोटी ५ लाख रुपये किमतीचे कोकेन जप्त केले. खार दांडा स्मशानभूमीजवळ ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, मुंबई सेंट्रल येथे दोघांना २१ मे रोजी अटक करून वरळी पथकाने १ लाख ४८ हजार रुपये किमतीचे एमडी जप्त केले होते.