प्रतीकची हत्या करणारे तिघे गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 06:30 AM2020-01-23T06:30:28+5:302020-01-23T06:30:31+5:30
शेलारनाका परिसरात प्रतीक, बाली जैसवार, निलेश धुणे यांना बोलावून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी घडली होती.
कल्याण : रस्त्यात उभी असलेली रिक्षा बाजूला घेण्यावरून झालेल्या वादातून प्रतीक गावडे (३०) याची हत्या, तसेच त्याच्या दोन मित्रांवर हल्ला करून पसार झालेले रवी लगाडे (२०, रा. शेलारनाका) व चंद्रकांत ऊर्फ चंदू जमादार (२१, रा. आजदेगाव) या दोघा सराईत गुन्हेगारांना कल्याण गुन्हे शाखेने २४ तासांत पकडले. तर, रमेश ऊर्फ झांगऱ्या घोरनाळला रामनगर पोलिसांनी अटक केली. तिघांना कल्याण न्यायालयाने सात दिवसांची कोठडी सुनावली आहे.
शेलारनाका परिसरात प्रतीक, बाली जैसवार, निलेश धुणे यांना बोलावून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी घडली होती. यात प्रतीकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या गुन्ह्याचा समांतर तपास करणाºया कल्याण गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार दत्ताराम भोसले आणि राजेंद्र खिलारे यांना हल्लेखोर कचोरेगाव येथील गावदेवी मंदिराच्या मागील बाजूस लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरीक्षक नितीन मुदगुन, हवालदार दत्ताराम भोसले, राजेंद्र खिलारे, राजेंद्र्र घोलप आदींच्या पथकाने सापळा रचला. यावेळी संशय आल्याने ९० फुटी रोडने कल्याण पत्रीपुलाच्या दिशेने पळणाºया रवी लगाडे आणि चंद्रकांत यांना पथकाने पाठलाग करून पकडले. दरम्यान, या दोघांनीही गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली.