खळबळजनक! आई, मुलीवर बलात्कार; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिघांना अटक
By पूनम अपराज | Published: January 4, 2021 08:51 PM2021-01-04T20:51:28+5:302021-01-04T20:53:24+5:30
Rape : याप्रकरणी दोघांना बलात्कारप्रकरणी आणि तिसऱ्या आरोपीला व्हिडीओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
नवी दिल्लीतील भारत नगर परिसरात आई आणि तिच्या १८ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पती सोडून गेल्यावर पीडित महिला आणि १८ वर्षीय मुलगी मिळेल त्या जागी राहून कचरा वेचून उदरनिर्वाह करत होत्या. ३० डिसेंबरच्या रात्री दारूच्या नशेत असलेल्या दोघांनी त्या दोघींना धमकावले आणि बलात्कार केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. वझीरपूर येथील जे जे कॉलनी येथे ही घटना घडली. याप्रकरणी दोघांना बलात्कारप्रकरणी आणि तिसऱ्या आरोपीला व्हिडीओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी पोलिसांनीअटक केली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात दगड घेऊन महिलेवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. पीडित महिला आणि मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ज्या व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ काढला होता, त्या व्यक्तीपर्यंत पोलीस पोहोचले. त्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली. भा. दं. वि. कलम 323/341/354/354C/376/509/506/34 अन्वये भारत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपयुक्त विजयानंद आर्य यांनी सांगितले पीडित आई आणि मुलीचा जबाब नोंदवला आहे. सोनू (२२) आणि अमित (२४) या दोघांना बलात्कारप्रकरणी तर रितिक (१८) याला व्हिडीओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.