मुंबई: प्रसिद्ध कंपन्यांची बनावट उत्पादने बनवणाऱ्या भिवंडीच्या कारखान्यावर धाड; तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2022 09:52 PM2022-07-31T21:52:25+5:302022-07-31T21:53:24+5:30
हँडवॉश, फिनाईल, एअरफ्रेशनर सारखी उत्पादनांचा समावेश, ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मच्छर पळवण्यासाठीचे लिक्विड, एअरफ्रेशनर, फिनाईल, हँडवॉश, शौचालय सफाई लिक्विड, कपडे धुण्याची पावडर आदी प्रसिद्ध कंपन्यांच्या बनावट उत्पादन व विक्री करणारे रॅकेट खाजगी गुप्तचर व मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणले. वरसावे नाका व भिवंडी येथील कारवाईत ६० लाखांची बनावट उत्पादने व कच्चा माल जप्त करून तिघांना अटक केली.
हार्पिक, डेटॉल, लायझॉल, कॉलिन आदींची बनावट उत्पादने तयार करून विक्री केली जात असल्याची माहिती कंपनीने नेमलेल्या खाजगी गुप्तचर कंपनीला मिळाल्या नंतर त्यांनी मीरा भाईंदर-वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार केली होती. खाजगी गुप्तचर कंपनीला मिळालेल्या माहिती नंतर त्यांच्या अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखा १ चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे सह सहायक निरीक्षक सुर्वे, उपनिरीक्षक हितेंद्र विचारे, तांबे पाटील, पठाण यांच्या पथकाने २६ जुलै रोजी वरसावे नाका येथील फाउंटन हॉटेल जवळ सापळा रचला होता. गुप्त माहिती नुसार एक इनोव्हा व सोबत एक लहान टेम्पो आला असता पोलिसांनी त्या दोन्ही वाहनांना ताब्यात घेतले व चौकशी सुरु केली. इनोव्हामध्ये मेहुल भूपेंद्र लिंबाचिया (३०) तर टेम्पो मध्ये चालक जाकीर मुसा शेख (२८) हे दोघे होते. दोन्ही वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये हार्पिक , लायझल , डेटॉल , कोलिन, सर्फ एक्सेल, गोदरेज आदीची गुडनाईट लिक्विड, एअरफ्रेशनर, फिनाईल, हँडवॉश, शौचालय सफाई लिक्विड, कपडे धुण्याची पावडर आदीचा साठा सापडला. बनावट लेबल लावलेली ती बनावट उत्पादने असल्याने पोलिसांनी १० लाखांची इनोव्हा आणि ५ लाखांचा टेम्पो सह २ लाख ६६ हजारांची बनावट उत्पादने असा एकूण १७ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल त्यात जप्त केला.
पोलिसांनी दोघाही आरोपींची कसून चौकशी केल्या नंतर सदर बनावट उत्पादने हि भिवंडीच्या कोपर भागातील अरिहंत कॉम्प्लेक्स मधील गाळ्यात बनवली जात असल्याचे सांगितले . पोलिसांनी लागलीच जाकीर ला घेऊन भिवंडी गाठले . पोलिसांनी त्या गाळ्यां मध्ये धड टाकली असता तेथे रजनीश पाठक नावाचा व्यवस्थापक आणि ४ कामगार आढळून आले. त्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात विविध रसायने , रिकाम्या बाटल्या व खोके , प्रसिद्ध कंपन्यांची बनावट लेबल व पॅकिंग आवरणे व बनावट तयार केलेला माल सापडला . सदर कारखाना बिपीन पटेल नावाच्या इसमाचा असून त्या ठिकाणी डोमेक्स , गोदरेज, टेपोल , लायझॉल , हार्पिक , गुड नाईट , ऑल आउट आदीचा बनावट व कच्चा माल आसा मिळून एकूण ५७ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी २८ जुलै रोजी काशीमीरा पोलीस ठाण्यात मेहुल लिंबाचिया , जाकीर शेख , रजनीश पाठक ह्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण एकूण ७५ लाख २३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे . ह्या प्रकरणात आरोपी बिपीन पटेल सह अन्य लोकांचा पोलीस शोध घेत आहेत