अमरावती येथील डॉक्टरला लुटणारे अकोल्यातील तीघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 07:52 PM2021-06-08T19:52:27+5:302021-06-08T19:52:34+5:30
Crime News : तिनही आरोपींनी डॉक्टरला धारदार शस्त्रच्या आधारे लुटल्याची कबुली पोलिसांसमोर दिली.
अकोला : अमरावती येथील रहिवासी असलेल्या डॉक्टरला ५ एप्रिल रोजी त्यांची कार अडवून धारदार शस्त्राच्या धाकावर लुटणाऱ्या अकोल्यातील तीन गुंडांना स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली.
अमरावती येथील डॉक्टर रितेश चौधरी हे ५ एप्रिल रोजी अकोला येथून त्यांच्या कारणे अमरावतीकडे जात असताना शिवनी नजिक त्यांच्याशी कुख्यात गुंड अनिल गजानन घ्यारे राहणार आंबेडकर नगर, अनिल उर्फ जॉन नंदू गुडदे आणि सुनील मारुती खिल्लारे तिघेही राहणार एमायडिसी यांनी डॉक्टर रितेश चौधरी यांच्याशी विनाकारण वाद घातला. त्यानंतर त्यांची कार अडवून धारदार क्शस्त्रच्या आधारे त्यांच्या कडील सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम व मुद्देमाल पळविला. या प्रकरणाची तक्रार एमआयडीसी पोलिस ठाण्यात देण्यात आली. एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनेही या चोरीचा समांतर तपास सुरू केला असता त्यांना ही चोरी अनिल घ्यारे, अनिल गुडदे व सुनील खिल्लारे या तिघांनी केल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांनी तीनही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता तिनही आरोपींनी डॉक्टरला धारदार शस्त्रच्या आधारे लुटल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण, जयंत सोनटक्के, अश्विन मिश्रा, किशोर सोनोणे, वसीम शेख, शक्ती कांबळे यांनी केली.