मोबाइलचे दुकान फोडणारे तिघे अटकेत, एक फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 01:32 AM2020-10-29T01:32:52+5:302020-10-29T01:33:25+5:30
Crime news : चाेरट्यांकडून विविध कंपन्यांचे २२ महागडे माेबाइल जप्त करण्यात आले असून त्यांची तीन लाख १२ हजार एवढी किंमत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
नालासोपारा - पूर्वेतील मोबाइलचे दुकान फाेडणाऱ्या तीन चाेरट्यांना तुळिंज पाेलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे २२ महागडे माेबाइल जप्त करण्यात आले असून त्यांची तीन लाख १२ हजार एवढी किंमत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
जया पॅलेसजवळील सूर्यकीर्ती सोसायटीमध्ये विशाल जैन यांचे श्रीनाथ मोबाइल ॲण्ड गिफ्ट कलेक्शन हे दुकान आहे. ६ ऑक्टाेबरला चोरट्यांनी या दुकानाच्या पाठीमागच्या खिडकीचे ग्रील उचकटून विविध कंपन्यांचे ३२ मोबाइल आणि रोख रक्कम असा चार लाख ४५ हजार ४२ रुपयांचा मुद्देमाल
चोरला हाेता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील यांना या चाेरट्यांचा तपास, सुगावा लागताच त्यांनी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हस्कोटी आणि त्यांच्या पथकाला सूचना देऊन कल्याणला पाठवले. पाेलिसांनी सापळा लावून २२ ऑक्टाेबरला राजकुमार पांचाळ (वय ३८), जमिल सिद्दिकी (४०) आणि यासिन ऊर्फ अस्लम मकबूल खान (३५) यांना अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख १२ हजारांचे २२ मोबाइल जप्त केले आहेत. तिघांना शुक्रवारी वसई न्यायालयाने सात दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली. मुंबई, नवी मुंबई, भाईंदर, ठाणे, वसई तालुका याठिकाणी प्रत्येकी २५ ते ३० गुन्हे दाखल आहेत. या तिघांचा आणखी एक साथीदार फरार असून त्याचा पाेलीस शाेध घेत आहेत.
चाेरीची चांदी झवेरी बाजारात विकली
राजकुमार पांचाळ याने भाईंदर येथील सत्यम ज्वेलर्समध्ये साथीदारांसह साडेअकरा लाखांची चोरी केली होती. तेव्हापासून ताे फरार होता. या दुकानात चाेरी केलेली पाच किलाे चांदी मुंबईतील झवेरी बाजारामध्ये विकल्याची त्याने पोलीस चौकशीत कबुली दिल्याचे पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्याचा पुढील तपासकामी भाईंदर पोलिसांना ताबा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.