अवघ्या दोन हजारात बनावट आधारकार्ड हाती, गुन्हे शाखेकडून तिघांना अटक
By मनीषा म्हात्रे | Published: January 18, 2024 06:52 PM2024-01-18T18:52:36+5:302024-01-18T18:52:54+5:30
गोवंडीतील 'रझा इंटरप्रायजेस' सह दोन सेंटरमध्ये अशाप्रकारे बनावट कागदपत्राद्वारे काम सुरु असल्याचे समजताच गुन्हे शाखेने बनावट ग्राहक महिला पाठवून आधारकार्डमध्ये बदल करण्यास सांगितले.
मुंबई : कुठलेही कागदपत्रे न देता अवघ्या दोन हजारात बनावट आधारकार्ड तसेच जुन्या आधारकार्ड मधील बदल करून देणाऱ्या आधार सेंटरचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत गुन्हे शाखेने बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या दोन आधारकार्ड सेंटर कारवाईत तिघांना अटक केली आहे.
गोवंडीतील 'रझा इंटरप्रायजेस' सह दोन सेंटरमध्ये अशाप्रकारे बनावट कागदपत्राद्वारे काम सुरु असल्याचे समजताच गुन्हे शाखेने बनावट ग्राहक महिला पाठवून आधारकार्डमध्ये बदल करण्यास सांगितले. आरोपींनी दोन हजार रुपयांत कुठलेही कागदपत्रे न घेता जुन्या आधारकार्डमध्ये बदल करून दिला. अखेर, खात्री पटताच गुन्हे शाखेच्या कक्ष ६ने छापा टाकला.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, १६ जानेवारी रोजी गोवंडीच्या रोड क्रमांक १० येथील 'रझा इंटरप्रायजेस' सह गोवंडीतील दोन्ही आधार सेंटरमध्ये बनावट शपथपत्रे, जन्म दाखले, बँकेकरीता आवश्यक के.वाय. सी., रेशनिंग कार्ड, पाणीपुरवठा बिल इत्यादी सरकारी दस्तऐवज त्यांच्याकडील लॅपटॉप व संगणकातील ठरवीक डिजीटल अॅप्लीकेशनच्या साहाय्याने ग्राहकाकडून कोणतीही कागदपत्रे न घेता बनावट कागदपत्रे तयार केली. ती कागदपत्रे आधारकार्ड बनविण्यासाठी वापरून, ती खरी असल्याचे भासवून शासनाची फसवणूक करत असल्याचे उघडकीस आले.
यामध्ये मेहफुज अहमद खान (३८), रेहान शहाआलम खान (२२), अमन कृष्णा पांडे (२५) याच्याविरुध्द शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवत आरोपीना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींना गुरुवारी न्यायालयाने २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.