वाहनांवरील कर्ज भरण्याचे आमिष दाखवून फसवणूक, तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 01:18 AM2020-03-16T01:18:06+5:302020-03-16T01:18:28+5:30
कर्जाने घेतलेल्या वाहनांचे बँकेचे हप्ते भरतो, असे सांगून ती वाहने ताब्यात घेऊन त्यांची परस्पर विक्री करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांना मिळाली होती.
ठाणे : वाहनांवरील कर्ज फेडण्याचे आमिष दाखवून वाहन ताब्यात घेऊन नंतर त्याची परस्पर विक्री करणाऱ्या तिघांच्या टोळीतील वसीम सलीम शेख (३४, रा. मालेगाव) याला शनिवारी मालेगाव येथून कासारवडवली पोलिसांनी अटक केली. यापूर्वीही इसाक शेख (२९, रा. औरंगाबाद) याच्यासह दोघांना औरंगाबाद येथून अटक केली असून, त्यांच्या आणखी एका साथीदाराचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कर्जाने घेतलेल्या वाहनांचे बँकेचे हप्ते भरतो, असे सांगून ती वाहने ताब्यात घेऊन त्यांची परस्पर विक्री करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे इसाक शेख आणि खयूम शेख (रा. औरंगाबाद) या दोघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार आणि पोलीस निरीक्षक प्रदीप उगले यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार चंद्रशेखर सकपाळे, पोलीस हवालदार प्रशांत सांगळे आणि विश्वनाथ दुर्वे यांच्या पथकाने औरंगाबाद येथून ११ मार्च रोजी अटक केली. त्यांना ठाणे न्यायालयाने १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीतून मालेगाव येथून वसीम याला १४ मार्च रोजी पोलिसांनी अटक केली. त्याला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
इसाक आणि खयूम हे दोघेही वाहन विकत घेणारे आहेत. वसीम हा वाहनमालकांची फसवणूक करून त्यांच्याकडील वाहने परस्पर विक्री करणारा आहे. या टोळीने आणखी किती जणांची अशाप्रकारे फसवणूक केली आहे, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.
वसीमविरुद्ध मध्य प्रदेशातही गुन्हे
वसीम याने मध्यप्रदेशातही अशाच प्रकारे वाहनमालकांची फसवणूक केली आहे. त्याच्याविरुद्ध मध्यप्रदेशातील मुगट रोड आणि पनदाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
ठाण्यात अशी झाली फसवणूक
ठाण्याच्या कासारवडवली येथील रहिवासी नितीन सांगळे यांनी एक ट्रक १६ लाखांमध्ये कर्जाने विकत घेतला होता. या ट्रकचे महिना ३६ हजारांचे बँकेचे हप्ते परवडत नसल्याचे त्यांनी भिवंडीत कामासाठी आलेल्या वसीमला सांगितले होते, तेव्हा तुझे बँकेचे हप्ते भरतो, कर्जही फेडतो; पण कर्जाचे हप्ते पूर्ण होईपर्यंत ट्रक आमच्याकडे दे, अशी गळ घातल्याने सांगळे यांनी त्यांचा ट्रक वसीमला दिला होता. सुरुवातीला त्यांच्याशी फोनवर बोलणारा वसीम नंतर फोनही घेईना. कालांतराने तो पसार झाला. या प्रकरणाची तक्रार सांगळे यांनी २१ जानेवारी २०२० रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याच फसवणुकीचा तपास करताना पोलिसांनी या तिघांना अटक केली.