बोईसरला जाणारी ट्रेन अडविणाऱ्या तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 03:33 AM2022-09-02T03:33:19+5:302022-09-02T03:33:38+5:30
Crime News: बोईसरला जाणाऱ्या ट्रेनला कामणरोड रेल्वेस्थानकात येण्यास उशीर झाल्याने स्थानकातील प्रवाशांच्या जमावाने स्टेशन मास्तरला धक्काबुकी केली. गुरुवारी तिघांना अटक करून रेल्वे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
डोंबिवली : बोईसरला जाणाऱ्या ट्रेनला कामणरोड रेल्वेस्थानकात येण्यास उशीर झाल्याने स्थानकातील प्रवाशांच्या जमावाने स्टेशन मास्तरला धक्काबुकी केली. यानंतर दीड तास रेल्वे थांबवून आंदोलन करणाऱ्या जमावावर डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुरुवारी तिघांना अटक करून रेल्वे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने त्यांना पोलीस ठाण्यात ठेवले होते, यातील अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली. डोंबिवली ते बोईसर जाणारी ट्रेन ३० ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजून ४९ मिनिटाने सुटून कामनरोड स्थानकात सकाळी ६ वाजून ३० मिनिटाने ३० पोहोचणे अपेक्षित होते. परंतु ट्रेन ७ वाजता म्हणजे अर्धा तास उशिरा पोहोचली. यावेळी स्थानकात असलेल्या सुमारे १०० प्रवाशांनी रेल रोको आंदोलन करून स्टेशन मास्तरला धक्काबुक्की केली. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. दीड तास आंदोलन सुरू होते.