बोईसरला जाणारी ट्रेन अडवणाऱ्या तिघांना अटक, कामण रेल्वे स्थानकातील घटना; १४ दिवसांची कोठडी
By अनिकेत घमंडी | Published: September 1, 2022 10:20 PM2022-09-01T22:20:13+5:302022-09-01T22:21:20+5:30
रेल्वे न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.
डोंबिवली : बोईसरला जाणाऱ्या ट्रेनला कामन रोड रेल्वे स्थानकात येण्यास उशीर झाल्याने स्थानकातील प्रवाशांच्या जमावाने स्टेशन मास्तरला धक्काबुकी केली. यानंतर दीड तास रेल्वे थांबवून आंदोलन करणाऱ्या जमावावर डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुरुवारी तिघांना अटक करण्यात आली. रेल्वे न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.
न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने त्यांना पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते, यातील अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली. डोंबिवली ते बोईसर जाणारी ट्रेन ३० ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजून ४९ मिनिटाने सुटून कामन रोड स्थानकात सकाळी ६ वाजून ३० मिनिटाने ३० पोहोचणे अपेक्षित होते. परंतु ट्रेन ७ वाजता म्हणजे अर्धा तास उशिरा पोहोचली.
यावेळी स्थानकात असलेल्या सुमारे १०० प्रवाशांनी रेल रोको आंदोलन करून स्टेशन मास्तर यांना धक्काबुक्की व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच त्यांचे कडून जबरदस्तीने कोऱ्या पेपरवर ट्रेन यापुढे लवकर येईल असे लिहून घेत, धमकी देऊन बेकायदेशीर जमाव जमवून आंदोलन केले होते. त्यानंतर ट्रेन दीड तासानंतर पुन्हा मार्गस्थ झाली होती. हा प्रकार घडल्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.