बॅंकेतील १२ कोटी रूपये लंपास करणा-या तिघांना अटक; ५ कोटी ८० लाखांची रोकड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 09:51 PM2022-07-18T21:51:20+5:302022-07-18T21:52:47+5:30
Crime News :९ ते ११ जुलै दरम्यान हा धाडसी चोरीचा बँकेत प्रकार घडला होता
डोंबिवली: येथील पुर्वेकडील मानपाडा परिसरातील आय.सी.आय.सी.आय बँकेच्या शाखेतून तब्बल १२ कोटी २० लाख रूपयांची रोकड चोरणा-या चौघांपैकी तिघांना ठाणे मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून ५ कोटी ८० लाखांची रोकड जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
९ ते ११ जुलै दरम्यान हा धाडसी चोरीचा बँकेत प्रकार घडला होता. बँकेत कार्यरत असणा-या व्यक्तीने अन्य तिघांच्या साथीने १२ कोटी २० लाखांची रोकड चोरली होती. याप्रकरणी स्थानिक मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मानपाडा पोलिसांसह ठाणे मालमत्ता गुन्हे शाखा पोलिसांच्या वतीने देखील या गुन्हयाचा समांतर तपास सुरू होता. मालमत्ता गुन्हे कक्ष शाखेचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनराव, सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश मुलगीर, महेश जाधव, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक स्वप्निल प्रधान, दत्तात्रय कटकधोंड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार अर्जून करळे, रुपवंतराव शिंदे, राजेंद्र घोलप, जयकर जाधव, महिला पोलीस हवालदार आशा गोळे, पोलीस हवालदार अजित शिंदे, पोलीस नाईक राजाराम शेगर, प्रशांत भुर्के, किशोर भामरे, पोलीस शिपाई राजकुमार राठोड, पवन शिंदे आदिंची विशेष पथके नेमण्यात आली होती.
यात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच पोलिस कर्मचा-यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीनुसार सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास मुंब्रा येथील मित्तल मैदानाजवळ सापळा लावून पोलिसांनी एकाला अटक केली. इसरार कुरेशी (वय ३३)असे त्याचे नाव असून त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने दिलेल्या माहीतीनुसार शमशाद खान (वय ३३) आणि अनुज गिरी (वय ३०) यांना ताब्यात घेऊन त्यांचीही चौकशी केली असता तिघांनी चोरीच्या गुन्हयाची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी केलेल्या रोकडपैकी ५ कोटी ८० लाखांची रोकड तर १० लाख २ हजार ५०० रूपये किमतीचा इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्हयातील मुख्य आरोपी असलेला बँक कर्मचारी मात्र अद्याप फरार आहे.