भिवंडी प्रांतकार्यालयातून भूसंपदानाचे ५८ लाख हडपणाऱ्या तिघांना अटक!
By नितीन पंडित | Published: November 21, 2022 04:42 PM2022-11-21T16:42:31+5:302022-11-21T16:43:17+5:30
रविवारी न्यायालयात हजर केले असता २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
भिवंडी : मुंबई - बडोदा महामार्गामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा मोबदला परस्पर हडप करणाऱ्या तिघांच्या मुसक्या शनिवारी शांतीनगर पोलिसांनी आवळल्या असून तिघांना रविवारी न्यायालयात हजर केले असता २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मोरेश्वर पाटील, रा. मोहिली, सुधाकर गुंदोलकर व भूषण नांदिसकर दोघे रा.दुगाड असे फसवणूक प्रकरणी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.तालुक्यातील दुगाड येथील मयत शेतजमीन मालक ठकी सवर हिच्या मुंबई-बडोदा महामार्गामध्ये जमीन बाधित होत असताना तिच्या जागी गावातील वयोवृद्ध भागीरथी मुकणे हिस ठकी सवर म्हणून उभे करून बनावट कागदपत्र बनवून शासनाकडून ५८ लाख ४२ हजार ९९६ रुपये नुकसान भरपाई मोबदला हडप केला होता.
याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी श्रमजीवी संघटनेने लावून धरत प्रांत कार्यालयावर मोर्चा देखील काढला होता अखेर उपविभागीय अधिकारी कार्यालयाने शांतीनगर पोलीस ठाण्यात १६ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला होता.वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विक्रमसिंह मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकातील महादेव शिंदे,संजय चव्हाण यांनी या गुन्ह्यात अवघ्या २४ तासात या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या गुन्ह्यात ज्या वृद्ध महिलेला उभे करून फसवणूक केली आहे,ते पाहता या गुन्ह्यांमध्ये अधिक आरोपींचा सहभाग असल्याचा संशय असून, भागीरथी मुकणे हिचे ठकी सवर नावाने आधार कार्ड बनविणे,बँकेत खाते उघडणे व शासन दरबारी सत्य प्रतिज्ञापत्र दाखल करून भागीरथी मुकणे हीच ठकी सवर असल्याचे भासविणे या गुन्ह्यात यांचा प्रत्यक्ष सहभाग स्पष्ट झाला असून बँकेतील पैसे कोणी काढले,कोणी खर्च केले व कोणी शासनास परत केले या बाबत चौकशी मध्ये अधिक नावे समोर येतील त्याप्रमाणे आरोपी अटक केले जातील अशी माहिती पोलीस निरीक्षक विक्रमसिंह मोहिते यांनी दिली आहे.