पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक; सापळा रचून केली कारवाई
By सूर्यकांत वाघमारे | Published: November 22, 2023 04:11 PM2023-11-22T16:11:57+5:302023-11-22T16:12:47+5:30
तुर्भे येथे अग्निशस्त्र खरेदी विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तिघांवर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व काडतूस जप्त करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेने तुर्भे येथे सापळा रचून हि कारवाई केली आहे.
तुर्भे येथे अग्निशस्त्र खरेदी विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याद्वारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सोमवारी रात्री परिसरात सापळा रचला होता. यावेळी तीन चाकी टेम्पो लगत उभ्या असलेल्या तरुणांच्या हालचालीवर पथकाला संशय आला. यामुळे त्यांना ताब्यात घेतले असता अंग झडतीमध्ये देशी बनावटीचे पिस्तूल व काडतूस आढळून आले. अरविंद विष्णोई (२२), श्रवण विष्णोई (२४) व पृथ्वीराज निकम (२१) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद व श्रावण तुर्भे परिसरात राहणारे असून पृथ्वीराज कळंबोलीचा राहणारा आहे. पोलिसांच्या कारवाईवेळी पृथ्वीराज याने पोलिसांना धक्काबुक्की करून कारवाईला विरोध करून तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी बळाचा वापर करून त्याला ताब्यात घेतले.