उल्हासनगर महापालिकेच्या कर निरीक्षकासह तिघांना लाच घेतांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2022 11:11 PM2022-06-09T23:11:54+5:302022-06-09T23:12:00+5:30
उल्हासनगर महापालिका मालमत्ता कर विभाग नेहमी वादात राहिला असून यापूर्वीही विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले.
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका कर विभागाच्या एका प्रभारी कर निरीक्षकासह दोन लिपिकांना पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरवारी रंगेहाथ अटक केली. मालमत्ता कराच्या पावतीवर नावाची नोंद करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती.
उल्हासनगर महापालिका मालमत्ता कर विभाग नेहमी वादात राहिला असून यापूर्वीही विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. गुरुवारी महापालिका मालमत्ता कर विभागात कार्यरत असलेल्या प्रभारी कर निरीक्षकासह तीन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केल्याची घटना घडली असून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील तक्रारदाराने मालमत्ता कराच्या पावतीवर नावाची नोंद करण्यासाठी महापालिकेत गेले असता, कर लिपिक शंकर सोहंदा याने तक्रारदाराकडे पाच हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्रासलेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
गुरुवारी तक्रारदार कॅम्प नं-४ परिसरात लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्यांना भेटायला गेले होते. त्यावेळी प्रभारी कर निरीक्षक भानू परमार, लिपिक शंकर सोहंदा, बलराम गिदवानी एका चार चाकी गाडीत बसले होते. महापालिका मालमत्ता कर विभागाचे कर निरीक्षक भानू परमार याने तक्रारदाराला शंकर सोहंदा यांना पैसे देण्याचे सांगितले. शंकर सोहंदा याने पैसे घेऊन लिपिक बलराम गिदवानी याला लाचेची रक्कम दिली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात तिघेजण रंगेहात सापडले. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर महापालिकेतील सावळागोंधळ व भ्रष्टाचाराची चर्चा पुन्हा रंगली आहे.