मणेरी धनगरवाडीतील बेपत्ता युवकाच्या खूनप्रकरणी तिघांना अटक; दोडामार्ग पोलिसांची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 07:57 AM2024-08-23T07:57:20+5:302024-08-23T07:57:40+5:30

दोन वर्षांपूर्वी खुन करून तो आपल्याला पचला या अविर्भावात ते तिघेही संशयित समाजात उजळ माथ्याने फिरत होते.

Three arrested in connection with murder of missing youth in Maneri Dhangarwadi; Performance of Dodamarg Police | मणेरी धनगरवाडीतील बेपत्ता युवकाच्या खूनप्रकरणी तिघांना अटक; दोडामार्ग पोलिसांची कामगिरी

मणेरी धनगरवाडीतील बेपत्ता युवकाच्या खूनप्रकरणी तिघांना अटक; दोडामार्ग पोलिसांची कामगिरी

- वैभव साळकर

दोडामार्ग : दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या मणेरी धनगरवाडी येथील उमेश बाळू फाले (वय -३२) याच्या खुनाच्या आरोपाखाली उसप येथील तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. राजाराम काशीराम गवस ( वय - ३४ ) , सचिन महादेव बांदेकर ( वय - ३२ ) व अनिकेत आनंद नाईक (वय - २५) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, राजाराम गवस हा युवक मणेरी धनगरवाडी येथील एका काजूच्या बागेत कामाला होता. याच बागेच्या काही अंतरावर उमेश फाले याचे घर होते. त्यामुळे दोघेही एकमेकांना चांगले ओळखत होते. उमेशला आपल्या पत्नीचे राजाराम याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयामुळे तो राजारामला नेहमी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होता. त्यामुळे राजारामच्या मनात उमेशबद्दलचा राग खदखदत होता. 

नेहमी शिवीगाळ करणाऱ्या या उमेशला कायमची अद्दल घडवायची असे राजाराम मनात ठरवून होता. पण त्याला ती संधी मिळत नव्हती. त्यामुळे त्याने उमेशचा काटा काढण्याचे ठरवून एक नियोजनबद्ध कट आखला. त्यात त्याने आपले मित्र अनिकेत नाईक व सचिन बांदेकर या दोघांना सामील करून घेतले. जे दारूसाठी वाट्टेल ते करायला तयार होते. राजाराम दारू पीत नसला तरी उमेशला दारूचे व्यसन आहे अणि त्यासाठी तो वाट्टेल तिथे यायला तयार होईल हे त्याने हेरले होते. त्यामुळे या तिघांनीही उमेशचा पत्ता कट करण्याचे ठरविले. 

दोडामार्ग व गोवा राज्याच्या सीमेवरील तिलारी धरणाच्या कालव्याजवळील वडाच्या झाडापाशी त्यांनी उमेशला दारू पिण्यासाठी बोलाविले. दारूच्या लालसेने उमेश तेथे आला. त्या तिघांनीही प्रथम उमेशला यथेच्छ दारू पाजली. त्यात तो चांगलाच झिंगु लागला. उमेश नशेत असल्याची हीच संधी साधून डोक्यात हैवान संचारलेल्या त्या तिघांही नराधमांनी आपला कट अंमलात आणण्याचे ठरविले.अनिकेत नाईक याने उमेशचे हात तर सचिन बांदेकर याने त्याचे पाय पकडले आणि राजारामने त्याच्या गुप्तांगावर लाथा मारल्या त्यांनतर दोरीने त्याचा गळा आवळला. 

एवढ्यावरच न थांबता त्या तिघांनीही क्रूरतेचा कळसच गाठत उमेशच्या डोक्यावर दगड घातला आणि मृतावस्थेत त्याला कालव्याच्या पाण्यात फेकून दिले. मात्र या प्रकारापासून उमेशचे कुटुंबीय अनभिज्ञ होते. त्यामुळे तो घरी परतला नसल्याने उमेश बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. कुटुंबीयांनी त्यानंतर शोध घेतला पण तो सापडून आला नाही.

असा लागला खुनाचा छडा -
दोन वर्षांपूर्वी खुन करून तो आपल्याला पचला या अविर्भावात ते तिघेही संशयित समाजात उजळ माथ्याने फिरत होते. मात्र खून कधीच कुणाला पचत नाही, असे म्हणतात तेच खरे झाले. यातील एका दारुड्या संशयिताने पंधरा दिवसांपूर्वी बारमध्ये दारू ढोसून नशेत खुनाबद्दल वाच्यता केली आणि याची खबर खबऱ्यांमार्फत दोडामार्ग पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रामचंद्र मळगावकर, समीर सुतार आदींनी त्या दारुड्या अनिकेतच्या संपर्कात कोण - कोण येतात त्यांची चौकशी काढली आणि खात्री पटताच गुरुवारी तिघांच्याही मुसक्या आवळल्या. अधिक तपास पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली दोडामार्ग पोलीस करीत आहेत. 

Web Title: Three arrested in connection with murder of missing youth in Maneri Dhangarwadi; Performance of Dodamarg Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.