५४ गुंतवणूकदारांना ९ कोटींचा गंडा; तिघांना अटक, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
By अजित मांडके | Published: February 23, 2023 07:32 PM2023-02-23T19:32:46+5:302023-02-23T19:33:20+5:30
चितळसर मानपाडा येथे राहणाऱ्या संध्या प्रफुल जैसवाल (३८) तिचे पती प्रफुल मोहनलाल जैसवाल (३८) आणि सचिन बालकृष्णन कॅमल (३४) असे अटक केलेल्या त्रिकुटाची नावे आहेत.
ठाणे : ज्वेलरी डिझायनर व इंटरप्रायझेस या कंपनीत गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर दरमहा ५ टक्के व्याज देण्याचे अमिष दाखवून, ठाण्यातील ५४ गुंतवणुकदारांना कोणताही मोबदला न देता ९ कोटी १९ लाख ३० हजारांचा गंडा घालणाऱ्या त्रिकुटाला अटक करण्यात ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला यश आले. यामध्ये एका दाम्पत्याचा समावेश आहे. अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी ठाणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
चितळसर मानपाडा येथे राहणाऱ्या संध्या प्रफुल जैसवाल (३८) तिचे पती प्रफुल मोहनलाल जैसवाल (३८) आणि सचिन बालकृष्णन कॅमल (३४) असे अटक केलेल्या त्रिकुटाची नावे आहेत. या तिघांसह पद्मिनी कॅमल अशा चौघांनी प्रिशा ज्वेलरी डिझायनर व प्रिशा इंटरप्रायझेस या कंपनीची स्थापना केली. तसेच त्यांनी स्वतःच्या अर्थिक फायदयासाठी गुंतवणुकदारांना गुंतवणुक रकमेवर दरमहा ५ टक्के व्याज देण्याचे अमिष दाखविले. तसेच तक्रारदारांसह ५३ गुंतवणुकदारांकडून गुंतवणुकी स्वीकारून कोणताही मोबदला न देता त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आल्यावर त्यांनी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
याचदरम्यान त्यांनी ५४ गुंतवणुकदारांची एकूण ९ कोटी १९ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार १५ जानेवारी २०१५ ते ०९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत घडला. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तपास करत तिघांना अटक केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक प्रविण महाजन करत आहेत.